लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : सुरेवाणी वनपरिक्षेत्रांतर्गतच्या बीट क्रमांक ७०९ मधील राेपवाटिकेत काम करणाऱ्या कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील मजुरी मिळत नसल्याने या कामगार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे; परंतु याकडे वनविकास महामंडळाचे दुर्लक्षच हाेत आहे.
सुरेवाणी येथील बीट क्र. ७०९ मधील सागवान राेपवन १९७६ भाग नं. १२ मध्ये कामगारांमार्फत आठवी विरळणीचे काम करण्यात आले; परंतु या कामगारांना मजुरीच्या पैशासाठी चार महिन्यांपासून प्रतीक्षाच करावी लागत आहे. या भाग क्रमांक १२ लगतच्या मजुरांना मार्किंगचे पगार देण्यात आले; परंतु कामगारांना मजुरी मिळाली नाही. वनरक्षक सिंगारपुतळे यांच्याकडे मजुरीबाबत विचारणा केली असता, वरिष्ठ अधिकारी हजेरी पत्रकास मंजुरी देत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मजुरीबाबत दाद कुणाकडे मागायची व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न कामगार विचारत आहेत.
वनरक्षक सिंगारपुतळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्यातील आपसी वादामुळे कामगारांची मजुरी थकीत असल्याचे समजते. कामगारांची परवड लक्षात घेता तातडीने याेग्य ताेडगा काढून मजुरीचे पैसे देण्याची मागणी कामगारांनी केली आहे.