रामटेक - बावनथडी सिंचन प्रकल्प तयार हाेवून १० वर्ष झाले. पण अजुनही पुसदा ,चिकनापुर,व पिंडकापार येथील विस्थापित नागरिकांच्या समस्या सुटल्या नाही. या भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी या समस्या साेडविण्यासाठी शासनाला साकडे घातले आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार व अधिकारी यांच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. समस्या त्वरित साेडविल्या जातील असे आश्वासन यावेळी मंत्र्यांनी दिले. प्रकल्पग्रस्ताच्या शेतजमीनच्या किंमतीच्या ६५ टक्के रक्कम पर्यायी जमीन देण्याच्या नावावर शासनातर्फे कपात केली हाेती. त्यामुळे पर्यायी जमिनीची व्यवस्था करुन सदर जमीन प्रकल्प ग्रस्ताना हस्तांतरित करण्यात यावी. सिंचन विभागाकडून प्रकल्प ग्रस्तासाठी आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील २.१७ काेटी रुपयाचे वाटपातील रकमेची शाहनिशा करुन उर्वरीत रक्कम प्रकल्पग्रस्ताना ताबाेडताेब देण्यात यावी. पुसदा-१, पुसदा-२, चिकनापूर, पिंडकापार या गावातील कामासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये मंजूर करण्यात यावे आदी विषयावर यावेळी चर्चा झाली.
यावेळी शांता कुमरे, सचिन किरपान, दुधराम सव्वालाखे, असलम शेख, निखिल पाटील, सरपंच प्रदीप काेडवते, शशीकला मरकाम, रामक्रिष्ण मेश्राम, सिंचन विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित हाेते.