नागपूर : नागपूर महानगरपालिकेकडून गुंठेवारी नागपूर सुधार प्रन्यासला हस्तांतरित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र एक महिना होऊनदेखील नासुप्रने गुंठेवारीची कारवाई सुरू केलेली नाही. संबंधित अधिकारी फाईल्स देत नसल्याचे कारण अधिकारी सांगत आहेत. यामुळे जनतेचे हाल होत असून याला जबाबदार कोण, असा सवाल पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केला आहे.
मनपाचा नगररचना विभाग नासुप्रला फाईल्स हस्तांतरित करण्यात वेळकाढूपणा करत आहेत. नासुप्रचे अधिकारी मनपाकडे तर मनपाचे अधिकारी नासुप्रकडे बोट दाखवत आहेत. या दोन्ही संस्थांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक अडचणीत आले आहेत. दोन्ही संस्थेत गुंठेवारीचे काम ठप्प झालेले आहे. मनपाच्या नगररचना अधिकाऱ्यांकडून शासनाचा निर्णयाचे उल्लंघन होत आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी तातडीने लक्ष घालावे व गुंठेवारी हस्तांतरणाची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी खोपडे यांनी केली आहे.