लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : लापका (ता. माैदा) शिवारातील शेतात एक हरीण (नर) मृतावस्थेत आढळून आले. याची माहिती वन अधिकाऱ्यांना वेळीच दिली असता, त्यांनी पंचनामा करण्यास व मृत हरणाची विल्हेवाट लावण्यास दिरंगाई केली. त्या हरणाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, त्याच्या शरीरावरील जखमा विचारात घेता, कुत्री किंवा इतर वन्यप्राण्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सेवकराम आमदरे, रा. लापका, ता. माैदा यांची लापका शिवारात शेती असून, त्यांनी त्यांची शेती माणिक रणदिवे यांना वाहायला दिली आहे. माणिक रणदिवे शनिवारी (दि. १०) सकाळी शेतात गेले असता, त्यांना मृत हरीण आढळून आले. मात्र, शेजारचे शेतकरी कृष्णराव रावी, रा. लापका यांना हे मृत हरीण शुक्रवारी सायंकाळीच आढळून आले हाेते. त्यामुळे त्यांनी याबाबत स्थानिक ग्रामपंचायत सदस्याला व सदस्याने शुक्रवारी रात्री याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेंडे यांना माहिती दिली हाेती.
त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी शनिवारी दिवसभर त्या मृत हरणाचा पंचनामा करण्यासाठी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट बघितली. मात्र, सायंकाळपर्यंत कुणीही घटनास्थळाकडे फिरकले नाही. त्यामुळे त्या हरणाचा पंचनामा करून त्याची याेग्य विल्हेवाट नेमकी लावणार कधी, असा प्रश्नही या भागातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
...
दाेन्ही पाय तुटलेले
या हरणाचे समाेरचे दाेन्ही पाय तुटलेले तसेच शरीर रक्तबंबाळ हाेते. त्यामुळे त्याची ही अवस्था कुत्री किंवा इतर वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेंडे यांना माहिती देऊनही त्यांनी पंचनामा करण्याची तसदी घेतली नाही. क्षेत्र सहायक तथा वनपाल अगडे यांनी प्रतिसाद दिला नाही. सहायक वनरक्षक संदीप गिरी यांनी पंचनामा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठविणार असल्याचे सांगितले हाेते. वास्तवात, कुणीही आले नाही.
...
या घटनेबाबत आपण वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेंडे यांना पंचनामा करण्याबाबत सूचना दिली हाेती. त्यांनी वेळीच पंचनामा व पुढील कार्यवाही करायला हवी हाेती. आपण वन कर्मचाऱ्यांना लापका येथे पाठवित आहे.
- संदीप गिरी, सहायक वनरक्षक.
...
आपण याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेंडे यांना सायंकाळी माहिती दिली हाेती. त्यांनी मला शेतात खड्डा खोदून त्यात मृत हरणाला गाडण्याची सूचना केली हाेती. परंतु, मी असे काहीही केले नाही. हरीण तिथेच मृतावस्थेत पडून आहे.
- माणिक रणदिवे, शेतकरी, लापका.