नागपूर : धावत्या गाडीच्या जनरल कोचमध्ये साप निघाल्यामुळे प्रवाशात घबराट निर्माण झाली. रेल्वे नागपूर स्थानकावर आल्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफच्या जवानांनी सर्पमित्राच्या साहाय्याने सापाचा शोध घेतला परंतु तो कुठेच आढळला नाही. १५ मिनिटांच्या विलंबानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. रेल्वेगाडी क्रमांक १२६२२ नवी दिल्ली-तामिळनाडु एक्स्प्रेस शुक्रवारी नागपूरला येत होती. या गाडीच्या गार्ड कॅबिनला लागून असलेल्या जनरल कोच क्रमांक ०६४३५ च्या मोडकळीस आलेल्या छतातून रेल्वे प्रवाशांना एक साप लोंबकळत असताना दिसला. हा साप खूप लांब होता. साप पाहून प्रवासी घाबरले. त्यानंतर ही गाडी दुपारी २.४५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आली. गाडीच्या गार्डने जनरल कोचमध्ये साप असल्याीच माहिती उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात दिली. तोपर्यंत ही बातमी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, आरपीएफचे जवान आणि सर्पमित्र प्लॅटफार्म क्रमांक २ वर पोहोचले. सर्वांनी सापाला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु साप कुठेच आढळला नाही. या घटनेमुळे ही गाडी १५ मिनिटे रेल्वेस्थानकावर खोळंबून राहिली. त्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. कोचमध्ये साप असल्याच्या दहशतीत जनरल कोचमधील प्रवाशांना प्रवास करण्याची पाळी आली. (प्रतिनिधी)
रेल्वेगाडीत साप निघतो तेंव्हा...
By admin | Updated: October 15, 2016 03:16 IST