मोतिबागच्या मालगोदामात मॉकड्रील : कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षणनागपूर : रेल्वेगाडीचा अपघात झाल्यानंतर स्लिपरक्लास कोचमध्ये अडकलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढून प्रथमोपचारानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ही खरोखर घडलेली घटना नसून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मोतिबाग येथील मालगोदामात कर्मचाऱ्यांना अपघातासारख्या प्रसंगी कशी सावधानता बाळगावी यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.प्रशिक्षणात रेल्वेगाडीत आग लागल्यानंतर तसेच अपघात झाल्यानंतर आपत्कालीन स्थितीत बचावकार्य कसे करावे याचे नाट्यमयरीत्या प्रशिक्षण देण्यात आले. यात एका रेल्वेगाडीच्या स्लिपरक्लास कोचचा अपघात झाल्याचे चित्र उभे करण्यात आले. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी या कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी छत आणि खिडकीला अत्याधुनिक उपकरणांनी कापून प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविल्याचा प्रसंग सादर केला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. गुप्ता, वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी ए. के. सतपथी यांच्यासह विभागीय अधिकारी, पर्यवेक्षक आणि २५० रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे प्रशासन नेहमी सतर्क राहत असून अपघाताची सूचना मिळताच विविध उपकरणांचा समावेश असलेली ‘रिलीफ ट्रेन’ त्वरित अपघातस्थळी पाठविण्यात येत असल्याचे सांगितले. प्रवाशांचे प्राण वाचविणे हा पहिला उद्देश असल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)
रेल्वेचा अपघात होतो तेव्हा...
By admin | Updated: September 11, 2014 01:09 IST