नागपूर: प्रत्येक कुटुंबाचा दरडोई दरमहा किती खर्च होतो याचे सरकारकडून सर्वेक्षण केले जात आहे.नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात काही निवडक गावांची यासाठी निवड करण्यात आली असून कामाला सुरुवातही झाली आहे. या कामासाठी यशदाची मदत घेतली जात आहे.राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी तसेच या योजनांच्या नियोजनासाठी प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची माहिती गोळा केली जाते. त्यावरून मानव विकास निर्देशांक काढला जातो. त्यानुसारच प्रत्येक कुटुंबाचा दर महिन्याला दरडोई किती खर्च होतो याची माहिती गोळा केली जात आहे. राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाते. यावेळी यशदाची मदत घेण्यात आली आहे. नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली असून जून २०१५ पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. नागपूर शहरातील वेगवेगळ्या वॉर्डातील २०४ प्रगणक गट निवडण्यात आल्याची माहिती सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने देण्यात आली आहे.नागपूर जिल्ह्यातील सर्वेक्षणाच्या कामात यशदातर्फे राजू सूर्यवंश यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वात सात सदस्यांची चमू वेगवेगळ्या तालुक्यात व शहराच्या विविध भागात सर्वेक्षण करीत आहे. माहिती गोळा करण्यासाठी येणाऱ्या सर्वेक्षकांना नागरिकांनी तसेच ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यशदाच्या मानव विकास केंद्राचे संचालक डॉ. मीनल नरवणे, प्रकल्प समन्वयक विनय कुळकर्णी, डॉ. अतुल नोबदे, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक अ.रा. देशमुख, उपसंचालिका नि.रु. पाटील, सांख्यिकी अधिकारी स.मा देशमुख यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
तुमचा महिन्याचा खर्च किती ?
By admin | Updated: November 6, 2014 02:44 IST