मनपाने करावर सोडले ‘पाणी’ : नियमित बिल भरणाऱ्यांना मात्र शिक्षानागपूर : साधारणत: एखादी व्यक्ती कुठलाही कर नियमित भरत असेल तर त्या व्यक्तीला सर्वप्रथम सवलत देण्याची योजना आखली जाते. मात्र, नागपूर महापालिकेने नेमकी याउलट योजना आखून करबुडव्यांना माफी देण्याचे काम केले आहे. ज्यांनी पाण्याचे बिल कित्येक महिने भरले नाही, हजारोंची थकबाकी केली त्यांना बिलात ५० टक्के माफी देण्याची योजना राबवून आधीच डबघाईस आलेल्या महापालिकेच्या करावर ‘पाणी’ सोडण्याचे काम केले जात आहे. यामुळे नियमित बिल भरणारे नागरिक संतापले असून, आम्ही मुदतीत पूर्ण बिल भरून कोणता गुन्हा केला, आम्हाला सवलत का नाही, असा सवाल करू लागले आहेत. पाणी बिलाचे सुमारे २०० कोटी रुपये थकीत आहेत. अवास्तव बिल पाठविण्यात आल्यामुळे आम्ही बिल भरले नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे थकबाकीची रक्कम वसूल होण्याची शक्यता कमीच आहे. यावर उपाय म्हणून ५० टक्के सवलत देण्याची योजना जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी यांनी जाहीर केली. करबुडव्यांनी या योजनेला लागलीच प्रतिसाद दिला व वाहत्या पाण्यात हात धुवून घेतले. तीन दिवसात सव्वा कोटींवर वसुली झाली. जवळपास तेवढीच रक्कम माफ करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीने पाणीकर भरला नाही म्हणून त्याला माफी द्यायची, हा कुठला न्याय, असा सवाल नियमित बिल भरणाऱ्या नागरिकांनी केला आहे. महापालिका भविष्यातही अशीच योजना राबविणार असेल तर आम्हीदेखील पोटाला चिमटा घेऊन बिल कशासाठी भरायचे, आम्हीही बिल भरणार नाही व नंतर असाच माफीचा फायदा घेऊ, अशी नाराजी नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. निवडणुकीसाठी चोरांना सवलतनागपूर : ओसीडब्ल्यूने कुठलेही करार पाळले नाही. उन्हाळ्यात बऱ्याच भागात जनतेला पाणी मिळाले नाही. पाण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी मंगळवारी झोनवर मोर्चा काढण्यात आला होता. महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप मतांचे राजकारण करीत आहे. प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्यांना लुटण्याचे काम करून राजकीय फायद्यासाठी चोरांना सवलती दिल्या जात आहे. प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्यांवर हा अन्याय आहे. उद्या मालमत्ता कर थकीत असलेल्यांना माफी देण्याची घोषणा केली जाईल. मतांसाठी अशा लोकप्रिय घोषणा करून भाजप प्रामाणिक माणसाचा हिरमोड करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रगती पाटील यांनी केला आहे.(प्रतिनिधी) मोठ्या ग्राहकांच्या फायद्यासाठी योजना पाणी बिल माफीच्या योजनेमागे एक मोठे रॅकेट काम करीत आहे. भाजपला पाठबळ देणारे मोठे बिल्डर, पाणी वापर करणाऱ्या कंपन्या, मोठे ग्राहक, पाणी विकणाऱ्या कंपन्या यांना मोठ्या प्रमाणात सवलत देता यावी यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. सामान्य नागरिकांकडे थकीत बिल होते ते तगादा लावून वसूल केले. समाजातील प्रतिष्ठा जपण्यासाठी नागरिकांनी बिल भरले. त्यामुळे सामान्य नागरिकांकडे फारशी थकबाकी नाही. जास्त पाणी वापर असणाऱ्यांकडेच मोठी थकबाकी आहे. त्यामुळे या पाणीकर माफीला बसपातर्फे विरोध केला जाईल. भाजपने नियमित बिल भरणाऱ्यांनाही अशी सवलत द्यावी व पुढील बिल माफ करावे. -गौतम पाटील, मनपा गटनेते, बसपा
करबुडव्यांना सवलत का?
By admin | Updated: June 19, 2016 02:36 IST