नागपूर : कष्टकरी कामगार, शेतकरी, शेतमजूर उन्हाची पर्वा न करता काम करीत असतो. दुपारच्या जेवणानंतर थकलेल्या कामगार, मजुराला सहज डुलकी लागते. यासाठी त्यांना महागड्या मॅट्रेसची गरज पडत नाही. दुसरीकडे, सोशल मीडियाच्या आहारी गेलेली मंडळी दिवस-रात्र स्क्रीनवर असतात. अशावेळी त्यांची पुरेशी झोप होत नाही. यामुळे कार्यक्षमतेसोबतच विविध आजारांचा धोकाही उद्भवतो.
- उन्हाचा पारा चढला
उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. मागील आठवड्यात ४१ ते ४२ अंशापर्यंत तापमानाची नोंद होत असताना आता पारा ४३.२८ अंशापर्यंत गेला आहे. यामुळे कष्टकऱ्यांनी उन्हात काम करण्याचे टाळणे गरजेचे आहे.
- दुसरीकडे झोप येत नाही म्हणून दवाखाना
गाढ झोप लागत नाही किंवा झोपेशी संबंधित तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, यातील फारच कमी जण या समस्येसाठी डॉक्टरांकडे जातात. अलीकडे या समस्यांचे खरे कारण मोबाइल अथवा टॅब्लेट आहे. झोपताना मोबाइलचा वापर केला गेल्याने झोपेविषयीच्या समस्या उद्भवत असल्याचा दावा एका संशोधनातून समोर आला आहे. मेंदूमधील ‘मेलाटॉनिन’ हे रसायन झोपेसाठी आवश्यक असते. आपल्या शरीरातील घड्याळाचे नियंत्रण हे रसायन करीत असते. मोबाइल अर्थात इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून परावर्तित होणारा प्रकाश आपल्या शरीरातील २२ टक्के ‘मेलाटॉनिन’ दाबून ठेवतो. त्याचा परिणाम झोपेवर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- चांगल्या झोपेसाठी हे करा
:: रात्री झोपण्याची व सकाळी उठण्याची वेळ ठरवून पाळा.
:: झोपण्याच्या दोन-तीन तासांपूर्वी मोबाइल, संगणक, लॅपटॉप किंवा टीव्ही बंद करा.
:: झोपण्याची खोली ही स्वच्छ, शांत, आरामदायी व काळाेखमय ठेवा.
:: झोपण्यापूर्वी कुठलाही मनावर ताण ठेवू नका.
:: दुपारी १२ वाजतानंतर चहा, कॉफी घेऊ नका.
:: रोज व्यायाम करा; परंतु, व्यायाम व रात्रीची झोप यामधील अंतर तीन ते चार तासांचे ठेवा.
:: रात्री उशिरा व जड जेवण जेवू नका.
:: रात्रीचे जेवण व झोपेची वेळ यात किमान दीड- दोन तासांचे अंतर ठेवा.
- चांगल्या आरोग्यासाठी गुणवत्तापूर्ण झोप महत्त्वाची
दीर्घकालीन कमी झोपेमुळे लठ्ठपणा, मधुमेह, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. याशिवाय नैराश्य, चिंता आणि मनोविकृती यांसारख्या अनेक मानसिक विकाराचा धोकाही संभवतो. पुरेशी झाेप न झाल्यास रस्ता अपघाताची शक्यता कित्येक पटीने वाढते. चांगले आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता राखण्यासाठी गुणवत्तापूर्ण झोप महत्त्वाची आहे.
- डॉ. सुशांत मेश्राम, प्रमुख ‘स्लिप मेडिसीन’ विभाग, मेडिकल