मेहा शर्मा
नागपूर : नागनदी व पिवळी नदीच्या काठावर लहान लहान जलशुद्धीकरण केंद्र (सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट-एसटीपी) उभारून १२ उद्यानाला पाणीपुरवठा करण्याची याेजना कार्यान्वित केली जात आहे. महापाैर दयाशंकर तिवारी यांनी नुकतेच या प्रकल्पाचे उद्घाटन केले. जपानी कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जात आहे. एकाच वेळी १२ उद्यानात एसटीपीद्वारे पाणी पुरवठा करणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर ठरेल.
दरराेज ५००० लिटर जलशुद्धीकरण करण्याची क्षमता राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे काैस्तुभ चटर्जी यांच्या मते, विकेंद्रीकृत एसटीपी उभारणे ही काळाची गरज आहे. नाग आणि पिवळी नदी काठावर लहान लहान एसटीपी तयार करणे महत्त्वाचे कार्य आहे. सांडपाण्याचे शुद्धीकरण करून गार्डनिंग व राेडसाईड वृक्षाराेपणासाठी त्याचा वापर हाेईल तसेच उरलेले पाणी नदीपात्रात साेडले जाईल. यामुळे नाग नदीचे प्रदूषण कमी करण्यास मदत हाेईल. मात्र या नद्यांच्या काठावर अनेक एसटीपी तयार करण्याची गरज आहे, अन्यथा अशुद्ध पाणी पुन्हा नदी पात्रात गेल्याने नदी शुद्धीकरणाचा उद्देश सफल हाेणार नाही, असे मत चटर्जी यांनी व्यक्त केले. असे असले तरी नाग व पिवळी नदीचे शुद्ध पाण्याचे स्रोत नसल्यात जमा आहेत. अशावेळी नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी हे नैसर्गिक स्रोत शाेधणे आवश्यक ठरेल. यासाठी केंद्राच्या नदी जाेड प्रकल्पांतर्गत नद्यांना जाेडणे पर्याय ठरू शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
नीरीचे माजी वैज्ञानिक डाॅ. जे. एस. पांडे यांनी प्रकल्पाचे स्वागत केले. झाडे ही जलशुद्धीकरणाची नैसर्गिक एजंट आहेत. ते बाष्पीभवन व श्वसनाचे दाेन्ही काम एकत्रित करतात. जमिनीचे बाष्पीभवन व झाडांचे श्वसन यामुळे जलशुद्धीकरणात मदत हाेते. काेणतीही झाडे मुळांद्वारे जमिनीतील पाणी शाेषून घेतात. बाष्पीश्वसन ही बाष्पीभवन व श्वसनाची एकत्रित प्रक्रिया आहे. सांडपाण्यातील न्यूट्रिएन्ट्स शाेषून त्यांचे विघटन करण्याची क्षमताही झाडांमध्ये असते. मात्र भाजीपाला व फळझाडांची लागवड टाळणे आवश्यक आहे कारण सांडपाण्यातील विषारी तत्व त्यात मिसळून मानवी आराेग्यास धाेका निर्माण हाेण्याची शक्यता असल्याचे डाॅ. पांडे यांनी स्पष्ट केले.