लाेकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : गावाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन नदीतून टाकण्यात आली. या नदीला आलेल्या पहिल्याच पुरात ती पाइपलाइन वाहून गेली. त्यामुळे पाइपलाइनच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गावाला ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा केला जाताे. ही पाइपलाइन पूर्वी गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या लांडगी नदीच्या पात्रात नाली खाेदून टाकण्यात आली हाेती. त्यासाठी नदीच्या पात्राच्या रुंदीएवढे बिडाचे पाइप वापरण्यात आले हाेते. उर्वरित पाइप पीव्हीसीचे हाेते. ते पाइप जुने झाल्याने नदीच्या पात्रातील पाणी पाइप व नळाद्वारे नागरिकांच्या घरी यायचे. नळाद्वारे येणारे पाणी गढूळ व पिण्यास अयाेग्य असल्याने आराेग्य विभागाने ग्रामपंचायतीला ‘रेड कार्ड’ दिले हाेते. त्यामुळे ग्रामपंचायतीने नदीच्या पात्रातील पाइपलाइन बदलविण्याचा निर्णय घेतला.
या कामासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ४ लाख ५० हजार रुपये मंजूर केले हाेते. हे काम स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने स्वत: करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण निधी ग्रामपंचायत प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आला हाेता. ग्रामपंचायतीने बिडाच्या पाइपच्या जागी चार इंचाचे १०० फूट लाेखंडी पाइप वापरले. नवीन पाइपलाइन जमिनीतून नेण्याऐवजी वरून टाकण्यात आली. त्यासाठी सिमेंटचे काॅलम तयार करण्यात आले. मात्र, या नदीवरील छाेट्या पुलाजवळील पाइपलाइन पहिल्याच पुरात वाहून गेली.
विशेष म्हणजे, ही पाइपलाइन तीन महिन्यांपूर्वी टाकण्यात आली हाेती. ही वाहून जाऊ नये, यासाठी याेग्य उपाययाेजना करण्यात आल्या नाहीत. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य देवका बोडखे, उपसरपंच कोठीराम दाढे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रेवतकर, हंसराज गिरडकर, माजी सरपंच जगन्नाथ मेटांगळे, ललिता खोडे, हिरू रेवतकर यांनी रविवारी दुपारी वाहून गेलेल्या पाइपलाइनची पाहणी केली. त्यांनी मजुरांच्या मदतीने काही पाइप काढले. पाइपलाइन वाहून गेल्याने गावाच्या काही भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण हाेण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.
....
४ लाख ५० हजार रुपयांचा खर्च
पाइपलाइन टाकण्याच्या या कामासाठी ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या ९ पीएच याेजनेतून मंजूर करण्यात आला हाेता. हे काम स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने कंत्राटदाराच्या माध्यमातून तीन महिन्यांपूर्वी पूर्ण केले. गावाच्या मध्य भागातून लांडगी नदी गेल्याने नदीतून पाइपलाइन नेण्यासाठी पात्रात सिमेंट काँक्रिटसारख्या उंचीचे छाेटे काॅलम तयार केले हाेते.
...
पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन पहिल्याच पुरात वाहून गेली. त्यामुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचेही स्पष्ट झाले. पाइपलाइन वाहून गेल्याने त्यावर केलेला खर्च वाया गेला आहे.
- देवका बाेडखे,
माजी जिल्हा परिषद सदस्य