नागपुरात ३६.४ मि.मी. पाऊस : गणेशभक्तांची तारांबळ नागपूर : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गुरुवारी उपराजधानीत चांगलाच धो-धो पाऊस बरसला. आठवडाभराच्या उसंतीनंतर आलेल्या या पावसाने शेतकरी निश्चितच सुखावला आहे, मात्र त्याचवेळी गणेशभक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. संततधार पावसामुळे गणरायाला अक्षरश: छत्रीचा आधार घ्यावा लागला. काल रात्री उशिरापासूनच नागपुरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. परंतु सकाळ होताच पावसाचा जोर वाढला. पाहता-पाहता दुपारी तो चांगलाच बरसला. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत एकूण ३६.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तसेच सकाळी ८.३० वाजतापर्यंत २४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात गणेशभक्तांनी पावसाची पर्वा न करता धो-धो पावसातच मिरवणुका काढून गणरायाचे उत्साहात स्वागत केले. विशेष म्हणजे, मागील तीन दिवसांपासून पूर्व विदर्भात पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. गुरुवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भात पाऊस बरसला. यात चंद्रपूर ७८.२ मि.मी., ब्रम्हपुरी १०३.६, गोंदिया ८०.४, वर्धा १९.४, यवतमाळ २.६, अमरावती १.२ व बुलडाणा येथे ४५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यापूर्वी मागील ७ सप्टेंबर रोजी उपराजधानीत असाच ३०.४ मि.मी. पाऊस बरसला होता. हवामान खात्याच्या मते, विदर्भ व छत्तीसगडमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील २४ तासापर्यंत काही ठिकाणी जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
धो धो पाऊ स
By admin | Updated: September 18, 2015 02:50 IST