लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जोवर सर्वसामान्यांना धक्का बसतो, तोवर शासन-प्रशासन केवळ आश्वासनांच्या फैरी झाडत असतात आणि तोंडदेखल्या कारवाईने मिशा पिळत असतात. मात्र, जेव्हा व्हीआयपींना धक्का बसतो तेव्हा झोपेचे सोंग घेतलेली व्यवस्था खडबडून जागी होते. हे चित्र अनेक वर्षांपासून सातत्याने दिसून येते. नायलॉन मांजाबाबत कठोर कारवाईसाठी ‘व्हीआयपी’ घटनेचीच वाट बघायची का, असा सवाल मजबूत व्हायला लागला आहे.
मंगळवारी संध्याकाळी नायलॉन मांजाने गळा कापल्याने युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना पुढे आली. प्रत्यक्ष नायलॉन मांजाने जीव गेल्याची ही तिसरी घटना असल्याचेही सांगितले जात आहे. मंगळवारीच याच मांजाने एका युवकाचा हात कापला गेल्याचेही स्पष्ट झाले. काही दिवसापूर्वीच गोधनी रोडवर एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा गळा कापला गेला आणि अतिशय गंभीर अवस्थेत त्याच्यावर ऑपरेशन झाल्याने तो बचावला गेला. त्या घटनेच्या पाच दिवसाने मानकापूर उड्डाणपुलावर एका ज्येष्ठ कलावंताचा अपघातही नायलॉन मांजामुळे झाला. अशा अनेक घटना गेल्या १०-१२ दिवसात घडल्या आहेत. मात्र, त्यांची नोंद झाली नाही. अशास्थितीत विक्रेत्यांवर दंडवसुलीची कारवाई करून प्रशासन काय साध्य करते आहे, हा मोठा प्रश्न आहे. जसजशी संक्रांत जवळ येत आहे, तसतशी नागरिकांच्या मनात नायलॉन मांजाबाबत धाकधूक प्रचंड वाढत आहे. विक्रेते आणि ग्राहक कायद्याला वाऱ्यावर उडवत असल्याने आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याने, आता नागरिकांनाच स्वत:च्या जीवाची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. त्याच अनुषंगाने नागरिकांनी घराबाहेर पडताना काही विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.
दुचाकीच्या पुढच्या भागात सळाक अथवा काठी
वाहन चालविताना नायलॉन मांजा कुठून आडवा येईल आणि आपला गळा कापल्याने तो क्षण अखेरचा असेल हे सांगता येत नाही. हा धोका विशेषत: बाईकस्वारांना अधिक आहे. त्यामुळे बाईकच्या हॅण्डलवर लोखंडी सळाक किंवा मजबूत अशी लाकडी काठी उभी राहील अशा तऱ्हेने लावा, जेणेकरून मांजा आलाच तर तो सळाक किंवा काठीमुळे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि वेळीच सावध होऊन मांजा बाजूला करता येईल.
फुलसाईज हेल्मेट आणि गळ्याभोवती दुपट्टा
वाहन चालविताना फुलसाईज हेल्मेट अतिशय आवश्यक आहे. सोबतच नाकातोंडाला व गळ्याभोवती जाड आवरण होईल, असा मोठा दुपट्टा गुंडाळून घ्या. जेणेकरून मांजा आडवा आलाच तर तो गळ्याचा किंवा शरीराच्या कुठल्याही भागाचा थेट वेध घेणार नाही आणि वाहन थांबवून मांजा बाजूला सारता येईल.
वाहनाची गती कमीच ठेवा
सर्वात जास्त धोका वेगाने बाईक चालविणाऱ्यांना आहे. एक तर मांजा हा अतिशय बारीक असल्याने तो सहसा नजरेस पडत नाही. त्यातच वाहन वेगात असल्याने सावध होण्यापूर्वीच आपला बळी गेलेला असतो. त्यामुळे बाईक चुकूनही वेगाने चालवू नका.
लहान मुलांना समोर बसवू नका
शक्यतोवर अशा काळात लहान मुलांना दुचाकीवर घेऊन बाहेर पडूच नये, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, निघालेच तर मुलांना आपल्यापुढे बसवू नका. मुलांचे शरीर अतिशय नाजूक असल्याने, नायलॉन मांजाची जखम त्यांना अतिशय गंभीर स्वरूपाचीच असेल. त्यांना पूर्णपणे दुपट्टा वगैरे आवरणात घेऊनच आपल्या मागे सुरक्षित बसवावे.
तात्काळ पोलिसात तक्रार करा
नायलॉन मांजाबाबत आता नागरिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. कुणी या मांजाची विक्री अगर खरेदी किंवा या मांजाने पतंग उडविताना आढळताच पोलिसात तक्रार करा. संबंधिताला थेट टोकले तर वाद होण्याचीच शक्यता जास्त असल्याने, तक्रारीसाठी पोलिसच उपयुक्त ठरतील. शिवाय, रस्त्यातच नायलॉन मांजा आडवा आला आणि तुम्ही सुरक्षित असल्याची हमी झाल्यावरही पोलिसांना तक्रार करणे गरजेचे आहे. पोलीस तक्रारी गेल्यावरच कदाचित प्रशासनाचे डोळे उघडण्याची शक्यता आहे.
...............