लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : घरकुल लाभार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून अनुदानासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. परिणामी, घरकुलाचे बांधकाम रखडल्याने लाभार्थी कुटुंबांना उघड्यावर संसार थाटून वास्तव्य करावे लागत आहे. त्यामुळे घरकुलासाठी शासनाने त्वरित निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली जात आहे.
माैदा तालुक्यातील सिरसाेली, वायगाव गट ग्राम पंचायतअंतर्गत असलेल्या वायगाव येथील तीन लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले. परंतु अनुदान न मिळाल्याने लाभार्थी कुटुंबांना उघड्यावर वास्तव्य करावे लागत आहे. वायगाव येथील कंठीराम गाेविंद शेंडे, शालिक तुकाराम गडे, प्रभाकर गाेविंद शेंडे यांच्यासह गावातील ५० नागरिकांना पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले. त्यानुसार पंचायत समितीने लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र दिले. शिवाय, बांधकाम सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. लाभार्थ्यांनी आपली जुनी घरे पाडून घरकुलाचे बांधकाम सुरू केले. बांधकाम हाेईस्ताेवर अनेक कुटुंब शेजारीच उघड्यावर वास्तव्य करीत आहेत. याला एक वर्षाचा कालावधी उलटला. परंतु घरकुल अनुदानाचा एक रुपयाही न मिळाल्याने घरकुलाचे बांधकाम हे पायव्यापर्यंत अर्धवट स्थितीत आहे.
यासंदर्भात संबंधित अधिकारी माधव कामत व सहायक अधिकारी गजानन नेताम यांच्याशी संपर्क साधला असता, घरकुलाची राशी मंजूर झाली असून, आपल्या केपीएमजीमध्ये घाेळ झाल्यामुळे निधी आवंटित करण्यात आलेला नसल्याने घरकुलाचे अनुदान मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे लाभार्थी कंठीराम शेंडे, शालिक गडे, प्रभाकर शेंडे यांना वर्षभरापासून उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. शासनाने १५ दिवसात घरकुलाचा निधी द्यावा, अन्यथा आंदाेलनाचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे. याबाबत पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री बच्चू कडू, जि.प. सदस्य याेगेश देशमुख यांच्याकडे निवेदन देऊन घरकुलाच्या निधीची मागणी केली आहे.