सेनेला बसणार धक्का : स्वतंत्र राज्य निर्माण होईल अशी विदर्भवाद्यांना आशाअभिनय खोपडे -गडचिरोलीविदर्भाच्या नावावर निवडणुका लढविणाऱ्यांना आजवर अपयश आले असले तरी यावेळी भाजप स्वबळावर मैदानात असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होण्याची शक्यता अनेक विदर्भवादी नेते व्यक्त करीत आहे. या सर्व स्वबळाच्या गडबडीत विदर्भ राज्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मात्र वैदर्भीय मतदाराच्या रोषाचा सामना करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. तत्कालीन केंद्र सरकारने तेलंगणा राज्य निर्माण केल्यानंतर विदर्भ राज्याच्या चळवळीनेही चांगला जोर पकडला. राजकीय पक्षांच्या नेत्यांमार्फत आजवर स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन छेडण्यात येत होते व या आंदोलनाच्या माध्यमातून विदर्भवादी नंतर निवडणुकांमध्ये उतरत होते. विदर्भाच्या नावावर निवडणुका लढणाऱ्यांना वैदर्भीय मतदारांना कधीही दाद दिल्याचे दिसले नाही. उलट विदर्भाच्या नावावर निवडणुका लढणाऱ्यांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या. मात्र तेलंगणाच्या निर्मितीनंतर गैर राजकीय संघटनांनी विदर्भ राज्याबाबत जोरदार जनजागृती संपूर्ण विदर्भात केली. त्यामुळे लोकांना विदर्भामध्ये किती ताकद आहे, छोटे राज्य कसे सक्षम होऊ शकते याची जाणीव झाली आहे. सध्याच्या महाराष्ट्र राज्यात राहून आपल्यावर कसा अन्याय झाला. याचीही जाण वैदर्भीय जनतेला झालेली आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाने पूर्वीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कार केला आहे. परंतु आजवर शिवसेनेचे लोडणे त्यांच्या गळ्याला असल्याने विदर्भ राज्याबाबत भाजप फारशी स्पष्ट भूमिका घेऊ शकलेला नव्हता. आता मात्र भाजप स्वबळावर निवडणूक लढत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. राज्यात जर भाजपला यश मिळाले तर विदर्भ राज्य वेगळे होण्यास कोणतीही अडचण राहू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भ राज्याला विरोधच केला आहे. गडचिरोलीत स्वत: अजित पवार यांनी विदर्भ राज्याला जनसमर्थन नसल्याचे म्हटले होते. तर काँग्रेस पक्षाने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शहीद झालेल्या ५६ हुतात्म्यांच्या स्मरणात मशाली जाळून विदर्भ राज्याच्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट करून टाकली आहे. तसेच दुसरीकडे भाजपने विदर्भ राज्याच्या चळवळीचे पूर्वीपासून नेतृत्व करणाऱ्या श्रीमंत राजे दिवंगत विश्वेश्वरराव महाराज यांच्या नाविससोबत अहेरी विधानसभा क्षेत्रात आघाडी केली आहे. त्यामुळे विदर्भवाद्यांना घेऊन चालण्याची भाजपची चाल स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला बळकटी देणारी ठरत आहे.
भाजपच्या स्वबळाच्या निर्णयाने विदर्भाच्या मागणीला आले बळ
By admin | Updated: October 1, 2014 00:52 IST