विधान परिषद : उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची माहितीनागपूर : मुंबई व औरंगाबाद येथील महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटीच्या पहिल्या कुलगुरूंची लवकरच नियुक्ती केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत नियम ९३ अन्वयेवरील सूचनेच्या उत्तरात दिली. मुंबई व औरंगाबाद येथील महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंची नियुक्ती करण्यासाठी योग्य व्यक्तींची शिफारस करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना केली होती. त्यानुसार सरन्यायाधीशांनी मुंबई येथील लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू पदासाठी प्रा. बी. पी. पांडा यांची शिफारस केली आहे. औरंगाबाद येथील लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू पदासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबाद लॉ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी सरन्यायाधिश यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शोध समितीचे अध्यक्ष यांना कळविण्यात आले आहे. नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी कुलगुरूंच्या वयोमर्यादेमध्ये सुधारणा व या पदासाठीची पात्रता या संदर्भात महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी अॅक्टमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा क रण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा, या संबंधीचा ठराव पारित केला आहे. या संदर्भात विद्यापीठ स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु हा प्रस्ताव अद्याप शासनाला प्राप्त झाला नसल्याची माहिती तावडे यांनी दिली. सदस्य सतीश चव्हाण यांनी नियम ९३ अन्वये ही सूचना मांडली होती.(प्रतिनिधी)
मुंबई व औरंगाबाद लॉ युनिव्हर्सिटीला मिळणार कुलगुरू
By admin | Updated: December 18, 2015 03:29 IST