३४ हजार लोकांना परत हिंदू बनविल्याचा दावा : सेवा कार्याचादेखील विस्तार करणारयोगेश पांडे नागपूर विश्व हिंदू परिषदेच्या ‘घरवापसी’ मोहिमेने संपूर्ण देशात खळबळ माजवली होती. देशभरात ही मोहीम अद्यापही सुरू असून जानेवारी ते जून या केवळ ६ महिन्यात सुमारे ३४ हजार लोकांना हिंदू धर्मात परत आणल्याचा दावा परिषदेतर्फे करण्यात आला आहे. घरवापसी झालेल्यांची संख्या काही हजार, काही लाख असल्याचे वेगवेगळे दावे ‘विहिंप’च्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत होते.‘विहिंप’च्या केंद्रीय व्यवस्थापन समितीची बैठक राजस्थान येथील भिलवाडा येथे या आठवड्यात झाली. या बैठकीत जानेवारी ते जूनपर्यंतचा आढावा मांडण्यात आला. या आढाव्यात ‘विहिंप’च्या धर्मप्रसार कार्यक्रमाची गेल्या ६ महिन्यातील माहिती देण्यात आली. या कालावधीत ४८ हजार ६५१ हिंदूंच्या धर्मांतरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला तर ३३ हजार ९७५ लोकांची हिंदू धर्मात ‘घरवापसी’ करण्यात आली, असा दावा करण्यात आला आहे. तसेच येत्या काळातदेखील ही मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 'केंद्र सरकार सक्तीच्या धर्मांतरावर बंदी आणत नाही, तोपर्यंत घरवापसी कार्यक्रम चालूच राहील,' असे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी याअगोदरच जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे या मुद्यावरून येत्या काळात राजकारण पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. यासंदर्भात डॉ.तोगडिया यांच्याशी संपर्क केला असता ते बैठकीत व्यस्त असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.(प्रतिनिधी)
विहिंपची ‘घरवापसी’ मोहीम सुरूच
By admin | Updated: July 4, 2015 03:01 IST