लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी व चारचाकी वाहनांची चाेरी करणाऱ्या सराईत चाेरट्यास वाडी पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एकूण १ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केेला असून, ही कारवाई साेमवारी (दि. ८) करण्यात आली, अशी माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. विनोद मुरलीधर मंडपे (३०, रा. बुद्ध विहाराजवळ, टेकडी वाडी) असे अटक करण्यात आलेल्या वाहन चाेरट्याचे नाव आहे.
रवी दादाजी मेश्राम, रा. डाॅ. आंबेडकरनगर, वाडी हे साेमवारी (दि. ८) सायंकाळी त्यांचे एमएच-४९/डी-०८७२ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन घरासमाेर पाण्याने साफ करीत हाेते. ते लघुशंका करण्यासाठी गेले असता, वाहनाला चावी तशीच असल्याने चाेरट्याने ते चाेरून नेले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली.
दरम्यान, टेकडी वाडी परिसरातील बुद्ध विहाराजवळ विनाेद हा एमएच-४९/डी-०८७२ क्रमांकाच्या वाहनाच्या केबिनमध्ये बसला असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्याने असंबद्ध उत्तरे दिली. नंतर मात्र गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे त्याच्याकडून मालवाहू वाहनासाेबतच एमएच-४०/एम-४४२१ क्रमांकाची दुचाकीही जप्त केली. या वाहनांची एकूण किंमत १ लाख ६० हजार रुपये असल्याचे ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी सांगितले. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक साजिद अहेमद, हवालदार सुनील मस्के, प्रमोद गिरी यांच्या पथकाने केली.