रामटेक : रामटेक तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. तालुक्यात दिवसाकाठी ५० अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे येथील गर्दीवर नियंत्रण आवश्यक आहे. गर्दीचे विकेंद्रीकरण केल्यास संक्रमणाचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. रामटेकच्या बाजारात विविध गरजेच्या वस्तूच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी असते. अशा वेळी सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवणे आणि भाजी बाजाराचे पुन्हा विकेंद्रीकरण करणे आवश्यक झाले आहे. कारण मुख्य बाजाराला लागूनच भाजी बाजार असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे हाताबाहेरचे झाले आहे. गतवर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर रामटेक नगरपालिकेच्यावतीने भाजीपाला बाजाराचे सात भागात विकेंद्रीकरण केले होते. त्यामुळे गर्दी विभागल्या गेल्याने परिस्थिती नियंत्रणात होती. आठवडी बाजारही बंद होते. आता आठवडी बाजार सुरू झाल्यावर कुणाचेच कुणावर नियंत्रण राहिले नाही, तसेच नियम पाळायचेच नाही, अशी वर्तणूक जनतेकडून होऊ लागल्याने संक्रमणात वाढ झाली. भाजीपाला बाजारात संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली की गर्दी वाढायला लागते. त्यामुळे येथील गर्दीला लगाम लावायचा असेल तर दुकानदारांना वेगवेगळ्या ठिकाणी जागा विभागून देणे आवश्यक आहे. यासोबतच विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
भाजीपाला बाजाराचे विकेंद्रीकरण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST