स्वामी सत्यमयानंद : नागपूर विद्यापीठात आर.एन.रॉय व्याख्यानमालेचे आयोजननागपूर : वेदांतामध्ये ज्याप्रमाणे तत्त्वज्ञानाचे सार सामावले आहे त्याचप्रमाणे त्याला विज्ञानाची पार्श्वभूमीदेखील आहे. वेदांतांमध्ये करण्यात आलेले मार्गदर्शन व उपदेश प्रत्येक स्तरांवर उपयुक्त असून ‘प्रॅक्टिकल वेदांत’ या विषयात वेदांमध्ये करण्यात आलेल्या मार्गदर्शन व उपदेशांच्या प्रात्यक्षिकावर जास्त प्रमाणात भर देण्यात येतो असे मत रामकृष्ण मिशन, कानपूर येथील स्वामी सत्यमयानंद यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे तीन दिवसीय डॉ.आर.एन.रॉय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना त्यांनी ‘स्वामी विवेकानंदांचा प्रत्यक्ष वेदांत विचार’ या विषयावर उद्बोधन केले.वेदांत म्हणजे तंत्र-मंत्र व पौराणिक विचार नसून, तो तत्वज्ञानाचाच एक प्रकार आहे. वेदांचा अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक स्तरातील लोकांना त्यात सामील करुन घ्यायला हवे, हे स्वामी विवेकानंदांचे विचार सत्यमयानंद यांनी मांडले. मनुष्याने ज्ञानाचा व एखाद्या नवीन गोष्टीचा अवलंब करण्यास तसेच दुसऱ्यांची मदत करण्यास सदैव तत्पर असावे. मंदिराबाहेर बसलेल्या एखाद्या गरीब व्यक्तीची मदत केल्यास मिळणारे समाधान काही औरच असते. सृष्टीवरील प्रत्येक ठिकाणी एकच ईश्वर आहे या स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या तत्त्वानुसार आचरण करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी स्वामी ब्रम्हस्थानंद व विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मोईज हक यांनी केले.(प्रतिनिधी)
वेदांताला तत्त्वज्ञानासोबत विज्ञानाची पार्श्वभूमी
By admin | Updated: January 9, 2015 00:48 IST