सुधीरकुमार गोयल : कर्तबगार शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांचा सत्कार पुसद (जि. यवतमाळ) : ‘शेतकरी सुखी तर देश सुखी’ ही जाणीव ठेवणारा जाणता मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. शेती आणि शेती क्षेत्रात काम करून जगाच्या पाठीवर पायाभरणीचे त्यांनी काम केले, असे गौरवोद्गार राज्याचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी येथे केले. हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील कर्तबगार शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांच्या सत्कार सोहळ््यात ते बोलत होते. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, माजी मंत्री अविनाश नाईक, निरंजन नाईक, अॅड़. निलय नाईक, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, अॅड़ अनंतराव देवसरकर, मारोतराव वंजारे, वसंत कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, पंचायत समिती सभापती आशा पांडे, इंद्रनील नाईक, राज नाईक, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, विजय चव्हाण, आर.डी. राठोड, माजी कुलगुरू डॉ. शेषराव सुर्यवंशी उपस्थित होते. डॉ. गोयल पुढे म्हणाले, देश शेतकरी चालवितो. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही शेतीला राजकारणात व अर्थकारणात स्थान मिळाले नाही. ही खंत असली तरी शेतकऱ्यांसाठी झटणारा व शेतीला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा शेतकऱ्यांचा द्रष्टानेता कुणी असेल तर ते म्हणजे वसंतराव नाईक होते. मान्सून आणि मार्केटच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे. निव्वळ शासनावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वत: नियोजन केले पाहिजे. शेतकरी एकजूट झाला तरच त्याच्या मालाला योग्य भाव मिळू शकेल. प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. गोयल यांचा सत्कार दीपक आसेगांवकर यांनी केला. जळगाव जिल्ह्यातील बंभोरी येथील के.बी. पाटील यांना वसंतराव नाईक कृषी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उपराळीचे गणेश शिवाजी पाटील, सांगली जिल्ह्यातील पलूसचे संदीप तुकाराम शिरसाट, अहमदनगर जिल्ह्यातील भांडेवाडीचे सुरेंद्र तुळशीराम शिंदे, नांदेड जिल्ह्यातील साप्तीचे कबीरदास विश्वनाथ कदम, औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथील दीपक पांडुरंग चव्हाण, यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील अमृतराव दादाराव देशमुख, बुलडाणा जिल्ह्यातील शेळगाव येथील चंद्रकलाबाई प्रकाश सुरोशे यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रा. चंद्रकिरण घाटे यांनी स्वागतगीत तर प्रा. साधना मोहोड यांनी पसायदान सादर केले. डॉ.गोयल यांच्या हस्ते प्रा. दिनकर गुल्हाने संपादित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
वसंतराव नाईक होते शेतकऱ्यांचे जाणते मुख्यमंत्री
By admin | Updated: August 19, 2014 00:54 IST