वसीम कुरैशी
नागपूर : वंजारीनगर उड्डाणपुलाचे शनिवारी धूमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. याकरिता नागरिक दीर्घ कालावधीपासून प्रतीक्षा करीत होते. त्यामुळे नागरिकांनी उद्घाटनानंतर लगेच उड्डाणपुलाचा वापर सुरू केला. परंतु, मध्यरात्रीनंतर उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी, रविवारपासून पुन्हा नागरिक जुन्या रोडचा वापर करीत आहेत. या रोडने अजनीकडे जाण्यासाठी दीड किलोमीटर जास्त अंतर कापावे लागते. यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाची भावना पसरली आहे.
हा उड्डाणपूल योजनाबद्ध पद्धतीने बांधण्यात आल्याचा दावा केला जात होता. आता त्या दाव्यावर संशय व्यक्त केला जात आहे. अजनीकडील भागाकडे ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आला नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. रस्ते सुरक्षा मासांतर्गत या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. हा महिना संपायला अजून वेळ आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाय केले जाऊ शकत होते. ट्रॅफिक सिग्नल आधीच लावले असते तर, नागरिकांना निराश व्हावे लागले नसते. ३ जानेवारी २०१९ रोजी पुलाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल पूर्ण करण्यासाठी १८ ऐवजी २४ महिने लावले. ध्वनिप्रदूषण होऊ नये याकरिता पुलावर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, ट्रॅफिक सिग्नलला महत्त्व देण्यात आले नाही. हा पूल वाहतुकीसाठी मोकळा झाल्यानंतर रेल्वे मेन्स शाळेजवळ अपघात होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त करणारी बातमी लोकमतने प्रकाशित केली होती. असे असताना ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले नाही. यासाठी उद्घाटनानंतर प्रयत्न केले जात आहेत.
-----------
दोन दिवसांत सुरू होईल वाहतूक
वाहतूक पोलिसांनी अपघाताची शक्यता लक्षात घेता पुलावरील वाहतूक बंद केली आहे. अजनी भागाकडे ट्रॅफिक सिग्नल लावण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वेकडून वीजपुरवठा घेतला जाणार आहे. दोन-तीन दिवसांत ट्रॅफिक सिग्नल लागताच उड्डाणपूल वाहतुकीसाठी मोकळा केला जाईल.
- वैशाली गोडबोले, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग-३