निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर : उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार नागपूर : मुळात आपण भारतीय अनेक गोष्टीकडे उशिराच लक्ष देतो. पर्यावरण आणि वनसंवर्धनाच्या बाबतीत आपली डोळेझाक झाली. त्यामुळे कळलेच नाही वन कमी झाले. परंतु चांगले अधिकारी आल्याने वन आणि वन्यजीवांच्या बाबतीत कायदे तयार झाले. कायद्यामुळे आपल्याला वनांप्रतीचे कर्तव्य कळले. पूर्वीपेक्षा आता वनसंवर्धनात अधिक जागरूकता आली आहे. यात आणखी लोकसहभाग वाढविण्याची गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले. वनराई फाऊंडेशन व महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्काराने सालेकसा नवाटोला येथील वनक्षेत्ररक्षक सुरेश रहांगडाले यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला न्यायमूर्ती विकास सिरपूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, विशेष अतिथी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) डॉ. दिलीप सिंह, पक्षितज्ज्ञ गोपाळ ठोसर, वनराईचे कार्याध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, प्रशांत वासाडे, वनपाल संघटनेचे कार्याध्यक्ष माधव मानमोडे याप्रसंगी उपस्थित होते. गिरीश गांधी म्हणाले की, लोकसहभागाशिवाय वनसंरक्षणाची चळवळ यशस्वी होऊ शकणार नाही. आजोबांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाचे फळ नातू खायचे. आज आपण स्वमग्न झालो आहोत. त्यामुळे निसर्गाच्या बाबतीत तरी आपण येणाऱ्या पिढीपुढे कसे ताट वाढून ठेवणार आहोत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. केवळ सरकारी यंत्रणेच्या भरवशावर निसर्ग असो की वनसंवर्धन होणार नाही. त्यासाठी आपल्या मनात भावना रुजली पाहिजे. डॉ. दिलीप सिंह यांनी हवामान बदल ही मोठी समस्या असल्याचे सांगून वनसंरक्षणासाठी आता प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर संयुक्त समितीच्या माध्यमातून काम सुरू असल्याची माहिती दिली. वन पर्यटनाच्या माध्यमातून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असून, नवाटोला येथील गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन, ग्रामपंचायतीला ३० लाखांचे उत्पन्न झाल्याचे सत्कारमूर्ती सुरेश रहांगडाले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अजय पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)
वनांप्रतिचे कर्तव्यच उशिरा लक्षात आले
By admin | Updated: March 22, 2017 03:02 IST