लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, त्याचा सामना करण्यासाठी सर्वांत प्रभावी असलेल्या लसींचा मात्र असलेला तुटवडा हा सर्वांत चिंतेचा विषय ठरला आहे. नागपूर जिल्ह्याला दोन दिवसांनंतर लसींचा पुरवठा करण्यात आला. सोमवारी १९ हजार लसींचे डोस मिळाले. ते सुद्धा केवळ कोविशिल्डच्याच. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दुसरीकडे कोरोनाशी संबंधित इतर औषधांचा पुरवठाही कमी होऊ लागला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चिंता पसरली आहे. बहुतांश लसीकरण केंद्रे बंद आहेत. १८ ते ४४ वर्षांच्या वयोगटाचे लसीकरण बंदच आहे. आता केवळ ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जात आहे. यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. परंतु, ज्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत आहे, त्यावरून तरी दुसरा डोस घेणाऱ्यांचा अनुशेष भरून निघण्याची शक्यता नाही. नागपूर जिल्ह्याला सोमवारी १९ हजार कोविशिल्ड मिळाले. यातील १० हजार मनपा व ९ हजार ग्रामीण भागात वितरित केले जातील.
दुसरीकडे ऑक्सिजनचा पुरवठाही सोमवारी कमी होत केवळ ५७ मेट्रिक टनापर्यंत आला. तसेच रेमडेसिविर इंजेक्शन केवळ ९७ मिळाले. कोविडच्या उपचारासाठी आवश्यक टॉसिलीझूमेबचे २० इजेक्शन मिळाले.
बॉक्स
‘एम्फोटेरिसिन-बी’चे केवळ १६५ व्हायल
कोरोनाबाधित बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या आजाराने ते ग्रस्त होताहेत. नागपुरात मोठ्या प्रमाणावर या आजाराचे रुग्ण आढळून येताहेत. या आजाराच्या उपचारासाठी प्रभावी असलेले ‘एम्फोटेरिसिन-बी’ लिपिड इंजेक्शनचे केवळ १६५ व्हायल सोमवारी प्राप्त झाले, तर ‘एम्फोटेरिसिन-बी’ लायफोसोमल यांचा पुरवठाच झाला नाही. रविवारी दोन्ही मिळाले नव्हते. यापूर्वी शनिवारी ‘एम्फोटेरिसिन-बी’ लिपिडचे १३० व्हायल प्राप्त झाले होते. त्याचप्रकारे ‘एम्फोटेरिसिन-बी’ घेतात. अशा परिस्थितीत मिळालेल्या इंजेक्शनचा लाभ किती रुग्णांना होईल, हा प्रश्नच आहे.