लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : तालुक्यात सध्या काेराेनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. काेराेनाला थाेपवून लावण्यासाठी शासनातर्फे लसीकरण माेहीम सुरू आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना लस देणे सुरू हाेते. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ४५ वयाच्या वरील सर्वच नागरिकांना काेविड लस देण्याची साेय करण्यात आली आहे. काेराेनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी बाळगण्यासाेबतच नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे, असे मत तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी व्यक्त केले.
पारशिवनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात काेराेनाविषयक उपाययाेजना व अंमलबजावणीबाबत सभा पार पडली. या सभेत तहसीलदारांनी उपस्थितांशी संवाद साधला. तालुक्यात ग्रामीण रुग्णालय पारशिवनी, प्राथमिक आरोग्य केंद्र डोरली, दहेगाव जोशी, साटक, नवेगाव खैरी, कन्हान तसेच आराेग्य उपकेंद्र सालई टेकाडी, माहुली, नरहर, जुनी कामठी, खंडाळा घटाटे, जे.एन. हॉस्पिटल कन्हान आदी ठिकाणी नागरिकांना लसीकरण करण्याची सोय करण्यात आली आहे. ४५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांनी १ ते १० एप्रिल या कालावधीत लस टाेचून घ्यावी. ही माेहीम यशस्वी करण्याकरिता तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी यांनी गावागावात जाऊन ४५ वयापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक संकलित करावे, कुणीही सुटता कामा नये तसेच नागरिकांना कोरोनाविषयक उपाययोजनेसंदर्भात जनजागृती करावी, अशा सूचनाही तहसीलदार सहारे यांनी दिल्या. यावेळी खंडविकास अधिकारी अशोक खाडे, नायब तहसीलदार कैलास अल्लेवार, गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, डॉ. अन्सारी तसेच शिक्षक, आरोग्य अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक कैलास लोखंडे यांनी केले. नायब तहसीलदार कैलास अल्लेवार यांनी आभार मानले.