लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : सध्या काेराेना संक्रमण झपाट्याचे वाढत असून ते राेखण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे नागरिकांच्या लसीकरणावर अधिकाधिक भर द्यावा, अशी सूचना विभागीय आयुक्त डाॅ. संजीवकुमार यांनी केली. कामठी येथील तहसील कार्यालयात आयाेजित आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
तहसीलदार अरविंद हिंगे यांनी कामठी शहर व तालुक्यातील काेराेना संक्रमण आणि लसीकरण माेहिमेची माहिती दिली. तालुक्यातील संपूर्ण बाबींची माहिती जाणून घेत डाॅ. संजीवकुमार यांनी ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना काेराेना लसी घेण्यासाठी प्रवृत्त करावे. भविष्यातील काेराेना संक्रमण आणि मृत्युदर कमी करण्यासाठी प्रत्येकाला लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगत त्यांच्या मनातील गैरसमज दूर करावे यासह अन्य महत्त्वाच्या सूचना केल्या.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर, उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अरविंद हिंगे, पंचायत समिती सभापती उमेश रडके, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, तालुका आराेग्य अधिकारी डॉ. संजय माने, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. नयना दुपारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर, नायब तहसीलदार रणजित दुसावार, राजेंद्र माळी, सुनील तरोडकर, आर. टी. उके, श्याम कवटी, विस्तार अधिकारी मनीष दिगाडे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
...
लसीकरणाचे याेग्य नियाेजन करा
कामठी तालुक्यात आजवर १९ हजार, नागपूर जिल्ह्यात १ लाख ४० हजार, तर देशभरात ६ काेटी ५० लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही लस घेतल्याने कुणालाही त्याचे दुष्परिणाम जाणवले नाहीत. काही नागरिक या लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण करीत आहेत, त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. उलट ते गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावे. ग्रामीण भागात लसीकरण माेहिमेला आणखी वेग देण्यासाठी स्थानिक लाेकप्रतिनिधींना विश्वासात घेत याेग्य नियाेजन करावे, अशी सूचना नागपूर विभागाचे आराेग्य उपसंचालक डाॅ. गिरी यांनी केली.