उपाशी आंदोलन करणाऱ्यांना दिले भोजन : टेकडी हनुमान मंदिर समितीचे दातृत्वनागपूर : आपल्या मागण्यांसाठी आणि न्याय मिळविण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून टेकडी मार्गावर संगणक परिचालक आंदोलन करीत आहे. राज्य शासनाने त्यांची दखल घेतली नाही म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते आंदोलन करीत आहे. न्याय मागण्यांसाठी आंदोलन करताना तब्बल पाच दिवस झाले. जवळचे पैसे संपले आणि उपासमार व्हायला लागली. एका धर्मार्थ संस्थेला त्यांची व्यथा कळली आणि माणुसकीचा गहिवर पाझरला. या संस्थेने आंदोलनकर्त्यांना भोजन देऊ केले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनाही बळ मिळाले.आंदोलनकर्ते भुकेने व्याकुळ होत होते आणि मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हलणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे. पक्की नोकरी मिळावी म्हणून हजारो संगणक परिचालक शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. तब्बल पाच दिवस झाले पण शासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. १६ जिसेंबर रोजी आंदोलनकारी हिंसक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी शासनाने मागण्या पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका घेतली. अनेक आंदोलनकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत. यात काही महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.माणसांना जोडणारा सेतू नागपूर : सरकारला आपल्या मागण्या सांगितल्यावर आश्वासन मिळताच एक वा दोन दिवसात परत जाण्याचा त्यांचा विचार होता. त्यामुळे कुणीच आवश्यक पैसे घेऊन आलेले नाही. दोन दिवसातच पैसेही संपले. तिसऱ्या दिवशी भोजन करण्यासाठीही पैसे उरले नाही. अखेर केळी खाऊन कसाबसा दिवस काढला. आंदोलकांची ही स्थिती पाहून टेकडी मार्गावरील हनुमान मंदिर समितीचे पदाधिकारी व्यथित झाले. कारण नसताना लहान मुले आणि महिलांची उपासमार त्यांना अस्वस्थ करणारी होती. सरकार ऐको वा नाही पण या आंदोलनकर्त्यांना मदत करायचा निर्णय समितीने घेतला आणि या समितीने त्यांना भोजन उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. या समितीने शुक्रवार दुपारपासून आंदोलनकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली. समितीचे पदाधिकारी या आंदोलनकर्त्यांना ओळखतही नाही पण माणुसकीचा हा गहिवर माणसांना जोडणारा सेतू झाला. भोजन मिळाल्यामुळे भुकेने व्याकुळलेल्या लहान मुलांचे हाल संपले आणि आंदोलनकर्त्यांनाही बळ मिळाले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री त्यांना भरपेट पुलाव दिला. शनिवारी भात, बेसन आणि कढीचे भोजन दिले. परक्या शहरात कुणीही ओळखीचे नसताना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या या आंदोलकांसाठी ही मदत महत्त्वाची आणि प्रशंसनीय आहे. काहीही संबंध नसताना मंदिर समिती आंदोलकांच्या मदतीला धावून आली. राज्य सरकारने त्यांच्याकडून आदर्श घेतला तर हजारो संगणक परिचालकांचे आयुष्य बदलू शकेल, असे मत आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले.(प्रतिनिधी)
आंदोलनकर्त्यांच्या मदतीसाठी धावली अनोळखी माणसे
By admin | Updated: December 20, 2015 02:53 IST