लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : औषधांची अनधिकृत खरेदी-विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या तसेच बनावट बिले तयार करून प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या गिट्टीखदानमधील एस. आर. फार्मा या होलसेल औषध विक्री करणाऱ्या संचालकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल केला.
दुर्गा चौक गोरेवाडा येथे मेट्रो प्लाझामध्ये मेसर्स एस. आर. फार्मा नामक औषधाचे होलसेल दुकान आहे. सूर्यराजन गोविंदराज पिल्ले हे त्याचे संचालक आहेत. काही दिवसांपूर्वी एका मेडिकल स्टोअर्सच्या संचालकांनी परवानगी नसतानादेखील अनधिकृतपणे झोपेच्या गोळ्यांची विक्री केली होती. याप्रकरणाची चौकशी करताना अन्न व औषध प्रशासनाला आरोपी पिल्लेच्या दुकानाची लिंक मिळाली. चौकशीत १ लाख १७ हजार टॅबलेट्स आणि औषधाच्या खरेदी-विक्रीचे गौडबंगाल या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पिल्लेकडे यासंदर्भात विचारणा केली. पिल्लेने बनावट बिले तयार करून अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सादर केली. त्यामुळे पिल्लेची बनवाबनवी उघड झाली. मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे औषधाची विक्री करून तो नागरिकांच्या जीविताशी खेळत असल्याचे लक्षात आल्यामुळे या विभागाच्या निरीक्षक शहनाज खलील ताजी (वय ४५) यांनी बुधवारी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार सुनील चव्हाण यांनी लगेच दखल घेत अन्न व औषध द्रव्य तसेच सौंदर्य प्रसाधन अधिनियम १९४० अन्वये आरोपी पिल्ले विरुद्ध गुन्हा दाखल केला.
मोठा औषध घोटाळा पुढे येणार ?
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास केला तर बनावट औषध निर्मिती आणि विक्रीचा मोठा घोटाळा पुढे येण्याची शक्यता संबंधित वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.