नागपूर : अजनी इंटर मॉडेल स्टेशनसाठी अजनी रेल्वे कॉलनी परिसरातील हजारो वृक्षांच्या कटाईच्या प्रस्तावावरून वादळ निर्माण होत असताना, या कॉलनीतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी होत असलेल्या बांधकामासाठी विना परवानगी ६०-७० झाडे कापण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. येथील उद्यान नष्ट करून झाडे कापण्यात आली तर काही जाळण्यातही आली. यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने संताप व्यक्त केला असून, रेल्वेला शाे-काॅज नोटीस बजावणार असल्याचे सांगितले आहे.
एनएचएआयतर्फे इंटर माॅडेल स्टेशनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी रेल्वे काॅलनी परिसरातील हजाराे झाडे कापण्यात येणार आहेत. येथील क्वाॅर्टर्सही ताेडण्यात येणार असून, येथे राहणाऱ्या नागरिकांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात येणार आहे. रेल्वेने पुनर्वसनाची तयारी चालविली असून, रेल्वे मेन्स शाळेच्या समाेरच्या साऊथ अजनी परिसरात इमारतीचे बांधकाम केले जात आहे. येथे चार इमारतींमध्ये ९६ गाळे बांधण्यात येत आहेत. त्याचे कामही जाेरात सुरू आहे. मात्र या बांधकामासाठी मनपाच्या उद्यान विभागाची परवानगी न घेता अनेक झाडे कापण्यात आल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी पूर्वी उद्यान हाेते. उद्यान विभागाच्या माहितीनुसार, येथील ६० ते ७० झाडे कापण्यात आली आणि उद्यानही नामशेष झाल्याचे दिसून येत आहे. काही झाडे जाळण्यातही आली. याबाबत तक्रार मिळताच उद्यान विभागाचे अधीक्षक अमाेल चाैरपगार यांनी टीमसह येथे पाहणी केली. ही झाडे कापण्यासाठी परवानगीच घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.
गुगल मॅपवर पूर्वीची हिरवळ आज सपाट
उद्यान विभागासाेबत पर्यावरणप्रेमींनीही पाहणी केली. पर्यावरण अभ्यासक अनसूया काळे-छाबरानी यांनी सांगितले, या परिसरातील झाडे कापली आहेत व काही झाडांना जाळण्यात आले आहे. गुगल मॅपवर शाेध घेतला असता येथे उद्यान असल्याचे स्पष्ट हाेत असून, २०१८ पूर्वी हा भाग हिरवळीने दाटला हाेता. मात्र आज हा परिसर उजाड झाल्याचे दिसते. हे दाेन्ही नकाशे मनपाला दाखविण्यात आल्याचे अनसूया काळे यांनी सांगितले.
येथे झाडे कापण्यात आल्याचे दिसून येत आहे. यासाठी मनपाची परवानगी घेतलेली नसल्याचे प्राथमिक पाहणीत समजते. याबाबत विभागातर्फे सर्वेक्षण करून चाैकशी करण्यात येत आहे. ही चाैकशी शुक्रवारपर्यंत पूर्ण हाेईल. याबाबत रेल्वेला कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात येईल.
- अमाेल चाैरपगार, उद्यान अधीक्षक, मनपा