मॅट्रिक्स इन्फ्राइस्टेट : कोट्यवधीचे फसवणूक प्रकरणनागपूर : नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह अन्य शहरात टाऊनशिप उभारण्याचे आमिष दाखवून अनेकांची २ कोटी ३१ लाख ८१ हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या धंतोलीच्या आशा टॉवरस्थित मॅट्रिक्स इन्फ्राइस्टेटच्या आणखी दोन संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. अमित ईश्वरी राव आणि राजेंद्र नामदेवराव भागवत, अशी या आरोपी संचालकांची नावे आहेत. यापूर्वी विजय त्रिलोकचंद वर्मा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. या प्रकरणात डॉ. सुचितकुमार दिवाण रामटेके याच्यासह १२ आरोपी आहेत. अमरावती येथील कैलास भीमराव पाटील यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी १८ जुलै २०१५ रोजी या सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींनी धंतोली येथे आपले कार्यालय उघडल्यानंतर विविध शहरात टाऊनशिप, डेव्हलपमेंट हाऊसिंग स्किम, व्यापारी संकुल आणि इतर रहिवासी बांधकाम उभारले जात असल्याबाबतच्या जाहिराती वृत्तपत्रातून प्रसिद्ध केल्या होत्या. ठिकठिकाणी प्रॉपर्टी शो आयोजित केले होते. जाहिरातीनुसार कैलास पाटील आणि इतरांनी या कंपनीच्या वानाडोंगरी येथील १.२७ हेक्टर जागेवरील प्रस्तावित रॉयल टाऊनशिप स्कीममध्ये फ्लॅट, दुकान, रो हाऊस रोख रकमेचा भरणा करून बुक केले होते. सर्व व्यवहाराचे अॅग्रीमेंट करून १८ महिन्यात बांधकाम पूर्ण करून जागेचा ताबा देण्याचे कंपनीकडून कबूल करण्यात आले होते. प्रत्यक्षात या कंपनीने वानाडोंगरीची ही जमीन खरेदीच केली नव्हती. संबंधित जिल्हाधिकारी, नगररचना, नासुप्र आदी शासकीय कार्यालयांकडून परवानगीही घेतली नव्हती. ही बनवाबनवी लक्षात येताच लोकांनी आपले पैसे परत मागितले असता त्यांना पैसेही परत करण्यात आले नाही. त्यांची फसवणूक करण्यात आली. १२ जून २०१० ते ७ डिसेंबर २०१२ या काळात ही फसवणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)फसवणूक झालेल्यांची यादीमॅट्रिक्स इन्फ्रा इस्टेटच्या मोहात अडकून प्रेमदास गणवीर यांची ८ लाख ८३ हजार, सुचित्रा लोहकरे यांची २ लाख ६१ हजार, धर्मेंद्र यादव यांची ३ लाख ५ हजार, अनुर्ध्वज रंगारी यांची २ लाख ९८ हजार, हेमंत करमरकर यांची १ लाख ५३ हजार, सुनील खोब्रागडे यांची ८६ हजार, नलिनी कुळकर्णी यांची २ लाख ८० हजार, अमित रेवतकर यांची ५ लाख ५८ हजार, सविता गोन्नाडे यांची ३ लाख ३६ हजार, जयश्री चोले यांची ३ लाख ७७ हजार, संजय रामटेके यांची ६५ हजार, संजय सोमकुवर यांची ८० हजार, नंदकिशोर साबळे यांची २ लाख ९० हजार, सुरेश ब्राह्मणकर यांची २ लाख ९५ हजार, राजेश चेटुले यांची १ लाख ७८ हजार, शेवंताबाई रावते यांची ३ लाख १२ हजार, नरेंद्र चोले यांची २ लाख ३० हजार, विलास कापगते यांची १ लाख ८३ हजार, प्रफुल्ल कानांनी यांची १६ लाख ८० हजार आणि भीमराव खोब्रागडे यांची २ लाख ८० हजाराने फसवणूक झालेली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये मध्यमवर्गीय, नोकरदार आणि सेवानिवृत्तांची मोठी संख्या आहे. स्वत:च्या घराचे स्वप्न पाहून त्यांनी या कंपनीकडे आपल्या मेहनतीच्या पैशाचा भरणा केला होता. या कंपनीने अनेकांना चेकने पैसे परत केले. परंतु कंपनीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने त्यांचे चेक परत आले. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर, प्रशांत साखरे, लीलाधर शेंद्रे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस उपनिरीक्षक के. एन. गड्डिमे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.
आणखी दोन संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Updated: August 2, 2015 03:07 IST