नागपूर : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीयू)च्या नेतृत्वात कालपासून सुरू असलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने दुसऱ्या दिवशीही कामकाज प्रभावित झाले. या दोन दिवसात जिल्ह्यात ५ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. मंगळवारीही सुमारे २ हजार ८०० कोटी रुपयांची उलाढाल थांबली.
यूएफबीयूच्या नेतृत्वात देशभरातील सर्व नऊ बँक युनियन एआयबीईए, एयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू आणि एनओबीओ या संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दोन दिवसाच्या संपाने देशभरातील बँकांचे व्यवहार ठप्प झाले. देशभरातील १२ लाखाहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी यात सहभागी झाले असल्याचा दावा संघटनेने केला आहे. केंद्र सरकारच्या बँकविरोधी धोरणाच्या निषेधार्थ मंगळवारी दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी बँक ऑफ इंडियाच्या किंग्जवे शाखेसमोर धरणे देऊन निदर्शने केली.
ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लाॅईज असोसिएशनचे महासचिव जयवंत गुर्वे यांंनी जिल्ह्यातील बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. नागपुरातील कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन लावले आहे. या काळातही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या बँकविरोधी धोरणाला विरोध व्यक्त करून संपाला समर्थन दिले. निदर्शनादरम्यान ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लाॅईज असोसिएशनचे पदाधिकारी विजय ठाकूर, राकेश बंगाले, रामबच्चन यादव, नीतेश डुकरे, राकेश माहुले आदी उपस्थित होते.