व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन : समस्या सोडविण्याची ग्वाही नागपूर : राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांना दिलेल्या निवेदनात केली. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सदर निवेदन देण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बावनकुळे यांनी यावेळी कामठी येथील विविध समस्या मांडल्या. यात गणेशोत्सवादरम्यान भारनियमन पूर्णपणे बंद करण्यात यावे, कामठीतील जयस्तंभ चौक ते महात्मा गांधी चौक आणि पोलीस ठाणे ते शिवाजी चौका दरम्यानच्या दुभाजकावरील तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, बाबू हरदास चौक ते भाजीमंडी हा मार्ग वर्दळीचा असल्याने या मार्गावरील जड वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान बंद करण्यात यावी, शहरातील अंतर्गत रस्त्यांची वेळीच दुरुस्ती करण्यात यावी, गणेशात्सव मंडळांना नाहरकत प्रमाणपत्र एक खिडकी योजनेंतर्गत देण्यात यावे, भाजीमंडी चौक ते महादेव घाट कन्हान नदीदरम्यान तात्पुरता वीज पुरवठा करून पथदिवे लावण्यात यावे, श्री गणेश विसर्जनादरम्यान अपघात होऊ नये यासाठी कन्हान नदीच्या घाटावर नावाडी, बोट व जीवन रक्षक पथक तैनात करण्यात यावे, उत्सवादरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा यासह एकूण २२ मागण्या त्यांनी लावून धरल्या होत्या. सदर निवेदन व मागण्यांची दखल घेत प्रशासनाने कामठी येथे एक खिडकी योजना राबविली. शिवाय, महत्त्वाच्या ठिकाणचे अतिक्रमण हटविले. आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे लावून अंतर्गत रस्त्यांची दुरुस्तीही केली. जड वाहतुकीची समस्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली. (प्रतिनिधी)
भारनियमन बंद करा!
By admin | Updated: September 5, 2014 01:08 IST