तहसीलमध्ये गुन्हा : आरोपी गजाआड नागपूर : बार मालकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगारासह दोघांना तहसील पोलिसांनी अटक केली. अनिकेत विलासराव गायकवाड (वय ३१, रा. बडकस चौक) आणि कमलेश राधेश्याम ताकोते ( वय ३४, रा. हंसापुरी) अशी आरोपींची नावे आहेत. ताकोते हा सराईत गुन्हेगार आहे. जसमीतसिंग मनजिंतसिंग लांबा (वय ४२, रा. मेकोसाबाग शाळेजवळ, कडबी चौक) यांचा सोना रेस्टॉरेंट चौकात बीअर बार आहे. गुरुवारी मध्यरात्री बार बंद केल्यानंतर ७० हजार रुपये एका बॅगमध्ये ठेवून गुरुवारी मध्यरात्री ते आणि त्यांचा भाऊ वेगवेगळ्या मोटरसायकलने घराकडे निघाले. गांजा खेत चौकाजवळ जसमितसिंग यांना दुचाकीवर (एमएच ४९/ एन २१२८) आलेल्या दोन आरोपींनी रोखले आणि लांबा यांच्याजवळची रक्कम असलेली बॅग हिसकावून घेण्याचे प्रयत्न केले. लांबा यांनी आरोपींचा प्रतिकार करतानाच आरडाओरड केली. ती ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. एवढ्यातच भाऊ मागे राहिल्याचे पाहून जसमितसिंग यांचा भाऊसुद्धा तेथे आला. त्यांनी आरोपींकडे धाव घेताच गायकवाड आणि ताकोते आपली दुचाकी सोडून पळून गेले. लांबा यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसीलच्या पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. वडस्कर यांनी गुन्हा दाखल केला. ठाणेदार संतोष खांडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपींनी सोडलेल्या दुचाकीच्या नंबरच्या आधारे त्यांचा पत्ता काढला अन् त्यांना अटक केली. कमलेश ताकोते याच्यावर कोतवाली, गणेशपेठ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला आणि गायकवाडला आज कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. (प्रतिनिधी)
बार मालकाला लुटण्याचा प्रयत्न
By admin | Updated: March 4, 2017 02:05 IST