मिलिंद माने : अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्सचा पदग्रहण सोहळा नागपूर : संसर्गजन्य आजारावर लहान मुलांना प्रतिजैविक (अॅन्टीबायटिक) मोठ्या प्रमाणात दिले जाते. याचा दुरुपयोग वाढला आहे. यामुळे विषाणूची प्रतिकारशक्ती वाढते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फक्त प्रतिजैविक देऊन लहान मुलांमधील प्रतिकारशक्ती वाढत नाही, तर त्यासाठी विशेष प्रकारचा आहार बाळाला दिला गेला पाहिजे. बाळामधील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अगदी लहानपणापासून प्रयत्न केले गेले पाहिजेत, असा सल्ला आमदार डॉ. मिलिंद माने यांनी दिला.अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स, नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा रविवारी थाटात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्सचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, नवनियुक्त अध्यक्ष डॉ. आर.जी. पाटील, सचिव डॉ. गिरीश चरडे, डॉ. डी.एस. राऊत, डॉ. चेतन शेंडे, डॉ. खळतकर आदी उपस्थित होते.डॉ. माने म्हणाले, डॉक्टरांनी व्यावसायिकसोबतच सामाजिक क्षेत्रातही काम करीत राहायला पाहिजे. विशेषत: ग्रामीण भागात आज बालरोग तज्ज्ञांची फार गरज आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा ज्ञानाचा फायदा सामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. बालआरोग्याच्या संदर्भातील सरकारचे अनेक कार्यक्रम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. यात इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्सने मदत करायला हवी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. उदय बोधनकर यांनी नव्या कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत शैक्षणिकसोबतच सामाजिक उपक्रमही राबविण्याचे आवाहन केले. डॉ. आर.जी. पाटील यांनी अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स, नागपूर शाखेच्यावतीने वर्षभरात आयोजित विविध कार्यक्रम व उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, बालरोगाची माहिती व त्याच्या उपाययोजनेच्या जनजागृतीवर विशेष भर देण्यात येईल. उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उषाताई चाटी यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव मेहता व रुचिका पाटील यांनी केले. आभार डॉ. गिरीश चरडे यांनी मानले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे (एमएमसी) अध्यक्ष डॉ. किशोर टावरी, माजी अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी, अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्सचे नियोजित अध्यक्ष डॉ. सी.एम. बोकडे, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. राजेश अग्रवाल, डॉ. सुचित बागडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)बालमृत्यू कमी करण्यासाठी दत्तक घेणार गावेइंडियन अकॅडमी आॅफ पेडिअॅट्रीक्सचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जोग म्हणाले, इंडियन अकॅडमी आॅफ पेडिअॅट्रीक्सच्यावतीने बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राज्यातील काही गावे दत्तक घेण्यात येणार आहे. डायरिया व न्यूमोनिया नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष उपक्रम तयार करण्यात आले आहेत. कुपोषित बालकांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते कमी करण्यासाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लहानपणापासून प्रयत्न व्हावेत
By admin | Updated: February 2, 2015 01:05 IST