|
नागपूर : डॉक्टरला बदनामीचा धाक दाखवून ८ लाखांची खंडणी मागणार्या एका भामट्याला सीताबर्डी पोलिसांनी नाट्यमयरीत्या अटक केली. प्रमोद रामभाऊ मुळे (वय ३२) असे या भामट्याचे नाव आहे. तो चिटणीसपुरा (हिवसेच्या वाड्याजवळ) महाल येथे राहतो. सीताबर्डीतील एका ६१ वर्षाच्या डॉक्टरकडे एका ४0 वर्षाच्या महिलेचे नेहमी जाणे-येणे होते. मैत्री झाल्यानंतर ही महिला डॉक्टरच्या मागे लागली. मला दुसरी बायको म्हणून ठेवून घ्या, असे तिचे म्हणणे होते. ७ मे रोजी डॉक्टरच्या रुग्णालयात येऊन तिने या संबंधाने गोंधळही घातला. डॉक्टरने नकार दिल्यामुळे तिचा थयथयाट सुरू होता. दरम्यान, हा प्रकार आरोपी प्रमोद मुळेला कळला. त्याने कट रचला. आपण एका प्रतिष्ठित मराठी दैनिकाचे पत्रकार आहो. वृत्तपत्रात तुमचे प्रकरण छापतो, अशी धमकी दिली. तुमचे आम्ही स्टिंग ऑपरेशनही केले आहे. तुम्हाला हा बदनामीकारक प्रकार टाळायचा असेल तर ८ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे मुळे म्हणाला. डॉक्टरांनी सरळ पोलिसांकडे धाव घेतली. सीताबर्डी पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे डॉक्टरने मुळेला आपल्या रुग्णालयात रक्कम घेण्यास बोलावले. ठरल्याप्रमाणे हा भामटा रुग्णालयात पहिला हप्ता घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी पोहचला. त्याने आपली ओळख दाखवून ५0 हजाराची खंडणी (पहिला हप्ता) स्वीकारताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. (प्रतिनिधी) |