मुकेश शाहू, गिरधारीसह पाच जणांविरुद्ध गुन्हानागपूर : एका लोखंड व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करून लुटणाऱ्या पाच जणांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुकेश जयदेव शाहू रा. सोनबानगर, गिरधारीलाल अग्रवाल रा. वर्धमाननगर, बबलू जयदेव शाहू रितेश शाहू रा. सोनबानगर आणि विनोद गुप्ता रा. पाचपावली, अशी आरोपींची नावे आहेत. संतोष ऊर्फ बंटी रामपाल शाहू (४२) रा. स्मॉल फॅक्टरी एरिया, असे फिर्यादीचे नाव आहे. तो लोखंड व्यापारी आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये या पाचही जणांनी या लोखंड व्यापाऱ्याला सुदर्शन चौकात गाठून ‘तुझे लोहे की दुकान चलानी है तो हम को ५० हजार रुपये फिरौती देनी पडेगी’ असे म्हटले होते.रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांनी या व्यापाऱ्याच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन आणि २० हजार रुपये रोख काढून घेतले होते. ‘फिरौती की बात मान ले वरना अंजाम बुरा होगा’ , अशी धमकीही दिली होती. या व्यापाऱ्याने सोमवारी नोंदवलेल्या तक्रारीवरून लागलीच या पाचही जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३८४, ३८६, १४३ आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींपैकी मुकेश शाहू हा कथित आरटीआय कार्यकर्ता असून तो सध्या कारागृहात आहे. त्याच्याविरुद्ध दाखल झालेला हा पाचवा गुन्हा आहे. यापैकी तीन गुन्हे विनयभंगाचे आहेत. गिरधारीलाल अग्रवाल याच्याविरुद्धही चोरीचे भंगार खरेदी करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला काही काळ तडीपारही करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यास रिव्हॉल्व्हरच्या धाकावर मागितली खंडणी
By admin | Updated: November 11, 2015 02:32 IST