उमरेड/भिवापूर : जिल्ह्यात उमरेड, भिवापूर आणि कुही हा उपविभाग मोठा आहे. कोळसा खदान, गिट्टी खदान, सावजी, अभयारण्य असा नैसर्गिक खजिना असलेल्या या उपविभागात आरोग्य यंत्रणाची दैना आहे. अशातच आता उमरेडसारख्या शहरात एकही सीटी स्कॅन यंत्राची सुविधा नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तीनही तालुक्यांत कोरोनाचा कहर वाढत चाललेला आहे. रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नाही. आॅक्सीजन मिळणेही कठिण झाले आहे. अशावेळी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सीटी स्कॅनसाठी नागपूर अथवा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचा प्रवास रुग्ण आणि नातेवाईकांसाठी यातना देणारा ठरत आहे.
सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यासाठी चार ते सहा दिवसांचा कालावधी लागतो. अहवाल येण्यासाठी उशीर लागत असल्याने औषधोपचार करायचा कसा, असा प्रश्न पडतो. अशावेळी सीटी स्कॅनच्या माध्यमातून स्कोअर लक्षात येतो. यावरून औषधोपचार करण्यास सोपे जात असते. सीटी स्कॅननंतर रुग्णाला होम क्वॉरंटाईन ठेवायचे की व्हॉस्पीटलमध्ये उपचार करायचे याबाबतचा निर्णय घेण्यास डॉक्टरांना अधिक सोयीचे होत असते. यामुळे कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीत सीटी स्कॅन यंत्र अतिशय मौलिक भूमिका वठविणारे ठरत आहे.
उमरेड, भिवापूर आणि कुही येथे एकाही ठिकाणी सीटी स्कॅन यंत्र नसल्याने तिनही तालुक्यातील रुग्णांची सोबतच त्यांच्या आप्तस्वकीयांचीसुद्धा गैरसोय होत आहे. नागपूर आणि ब्रह्मपुरी येथे काही तासांचा प्रवास केल्यानंतर पुन्हा सीटी स्कॅनसाठी तासनतास रुग्णांना प्रतीक्षाच करावी लागते. यामुळेही असंख्य रुग्ण कमालीचे अस्वस्थ होत असून, निदान उमरेड येथे सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे.
-
उमरेडसारख्या मोठ्या शहरात एकही सीटी स्कॅन नाही, याबाबत आश्चर्य वाटते. निदान उमरेडमध्ये ही सुविधा झाल्यास कुही आणि भिवापूर येथील नागरिकांसाठी उत्तम होईल. कुही येथील परिस्थिती बिघडत चालली असून तातडीने सीटी स्कॅनची सुविधा होणे गरजेचे आहे.
प्रमोद घरडे, कुही
संस्थापक, मातोश्री प्रभादेवी सेवा संस्था
----
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर भिवापूर वसले आहे. कोरोना बाधितांना वाहने उपलब्ध होत नाही. रुग्णांसह कुटूंबियांची पंचाईत होत आहे. याचा विपरीत परिणामही होतो. अशावेळी निदान उमरेड येथे सीटी स्कॅनची सुविधा फारच महत्त्वाची आहे.
अमोल वारजुरकर, भिवापूर
आरोग्य सुविधांच्या बाबतीत उमरेड अद्यापही फारशी प्रगती साधू शकले नाही. अशावेळी गावखेड्यातील रुग्ण उमरेडला उपचारासाठी गेल्यावर, त्यांना नागपूरचा रस्ता दाखविला जातो. सीटी स्कॅनसोबतच अन्य आरोग्य सुविधेकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे.
संजय वाघमारे, माजी सदस्य, पंचायत समिती, उमरेड