मेट्रोमध्ये सायकल नेणे शक्य : पर्यावरणपूरक प्रवासाला नागरिकांची पसंती
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ऑरेंज आणि अॅक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू आहे. नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. यात प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रोने सायकल सोबत नेण्याची मुभा देण्यात आली असून प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत.
महामेट्रोने प्रवाशांच्या सुविधेसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. गुरुवारी सुभाषनगर मेट्रो स्टेशन येथून लोकमान्यनगर स्टेशन दरम्यान काही नागरिकांनी सायकल सोबत मेट्रोने प्रवास केला. प्रवास करताना मेट्रोच्या प्रवाशांनी सुभाषनगर मेट्रो स्टेशन येथून लिफ्टच्या साहाय्याने कॉनकोर्स येथे प्रवेश केला. तिकीट काऊंटर येथून तिकीट घेऊन एएफसी गेटमधून परिसरात प्रवेश केला. त्यानंतर लिफ्टच्या साहाय्याने प्लॅटफॉर्मवर पोहोचून मेट्रो रेल्वेत प्रवेश केला. आपल्या सायकलसोबत हे प्रवासी आपल्या स्थानकापर्यंत पोहोचले. मेट्रोची ही सेवा आमच्यासारख्या सायकल चालविणाऱ्या व्यक्तींसाठी सोयीस्कर असून आता मेट्रोने सायकल नेणे सोयीस्कर झाल्याच्या प्रतिक्रिया या प्रवाशांनी व्यक्त केल्या. सायकलचा वापर करणारे नागरिक नक्कीच या सेवेचा लाभ घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सेवेमुळे आता मेट्रोचे प्रवासी आपल्या सोबत सायकल नेऊ शकणार असून मेट्रोची ही पर्यावरणपूरक सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरणार असल्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
..............