लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या बसस्थानक चाैकात माेठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी हाेती. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. या काेंडीमुळे वाहनांचा धक्का लागल्यास चालकांमध्ये भांडणेही हाेतात. हा प्रकार वाढत चालला असताना पाेलीस प्रशासन माहिती असूनही याकडे कानाडाेळा करीत आहे.
रामटेक शहरातील मुख्य मार्ग व बसस्थानक परिसर वर्दळीचा आहे. शहरात येणारी व शहराच्या बाहेर जाणारी बहुतांश छाेटी माेठी वाहने या भागातून जातात. या बसस्थानक परिसरातील राेडच्या दाेन्ही बाजूला अवैध प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने माेठ्या प्रमाणात उभी ठेवली जातात. ही वाहने नेहमीच अस्ताव्यस्त उभी केली जातात. त्यामुळे या भागातून मार्गक्रमण करताना इतर वाहनचालकांना तसेच बस व इतर वाहनांनी प्रवास करणारे प्रवासी व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागताे.
एवढेच नव्हे तर या ठिकाणी वाहतूक काेंडी हाेत असून, हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाहतूक काेंडीतून मार्ग काढताना एका वाहनाचा दुसऱ्या वाहनाला किंवा वाहनाचा पादचाऱ्यांना धक्काही लागताे. यातून वादाला ताेंड फुटते आणि भांडणेही हाेतात. प्रसंगी किरकाेळ अपघातही हाेत असून, या अपघात व भांडणाच्या घटना आता सामान्य हाेत चालल्या आहेत. हा प्रकार रामटेक पाेलिसांना माहिती आहे. मात्र, ही वाहतूक काेंडी कायमची साेडविण्यासाठी पाेलीस काहीही करायला तयार नाही.
अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाही पाेलीस पुढाकार घेत नाही. पूर्वी बसस्थानक परिसरात वाहतूक पाेलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जायची आणि ते दिवसभर कर्तव्यावर असायचे. अलीकडच्या काळात या ठिकाणी एकाही वाहतूक पाेलीस शाेधूनही दिसत नाही. त्यामुळे रामटेक पाेलीस ठाण्यात नियुक्तीवर असलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यांचा उपयाेग काय, असा प्रश्नही रामटेक शहरातील नागरिकांनी उपस्थित केला असून, ही समस्या कायमची साेडविण्याची मागणी केली आहे.
...
एसटी महामंडळाचे नुकसान
नियमानुसार बसस्थानकापासून दाेन्ही बाजूंनी २०० मीटर अंतरापर्यंत प्रवासी वाहने उभी करता येत नाही. परंतुु, रामटेक शहरात या नियमाची सर्रास पायमल्ली केली जात असून, पाेलीस प्रशासन मूकदर्शक बनले आहे. याच भागात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी ठेवली जात असून, या अवैध प्रवासी वाहतुकीला पाेलिसांसमाेर सुरुवात केली जाते. या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या रामटेक आगाराला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. शिवाय, प्रशासनाच्या वरदहस्तामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहे.
...
सर्व्हिस राेडवर अतिक्रमण
याच बसस्थानक परिसरात सर्व्हिस राेडच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. काही नागरिकांनी आतापासूनच त्या सर्व्हिस राेडवर अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे. काहींनी राेडवर तर काहींनी नालीवर दुकानेही थाटली आहेत. त्यांना कुणीही प्रतिबंध करायला तयार नाही. या बसस्थानक चाैकात राऊंड तयार केला जाणार असून, एकाच मार्गाने रहदारी हाेणार आहे. येथील वाहनांची अवैध पार्किंग अशीच राहिली तर ती आणखी धाेकादायक हाेणार आहे. या प्रकारामुळे नागरिक वैतागले आहेत.