लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात लाॅकडाऊनचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, पालकमंत्री नितीन राऊत यांनी घाेषणाही केली. परंतु, लाॅकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येत असल्याने हा लाॅकडाऊन रद्द करावा, अशी मागणी कामठी शहरातील व्यापाऱ्यांनी केली असून, त्यांनी तहसील कार्यालयासमाेर निदर्शने केली. शिवाय, पालकमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याकडे साेपविले.
शासनाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी आधीच दीर्घकाळ लाॅकडाऊन व संचारबंदी केली हाेती. या काळात जनजीवन विस्कळीत हाेऊन व्यापार व उद्याेगधंदे चाैपट झाले हाेते. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली हाेती. लाॅकडाऊन हटताच व्यापार व उद्याेग हळूहळू सुरळीत व्हायला लागले. त्यातच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी १५ मार्चपासून नागपूर जिल्ह्यात लाॅकडाऊनचे आदेश जारी केले.
या आदेशामुळे लाॅकडाऊन काळात पुन्हा दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहाणार असल्याने नुकसान सहन करावे लागणार आहे. यात सर्वसामान्य माणसांसह कामगारांचे हाल हाेणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक शनिवार व रविवार लाॅकडाऊन कायम ठेवावा तसेच सलग लाॅकडाऊन करू नये, असेही व्यापाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात व्यापारी संघटनेचे श्रीकांत शेंद्रे, सुनील पमनानी, धरमदास पारवानी, मनोज बतरा, राजा वंजारी, दीपक चावला, सूरज वासवानी, आनंद परवानी, रवी लालवाणी, विक्की दीपानी, भारत हरदवानी, विक्की हळदवानी यांचा समावेश हाेता.