हिवराबाजार : जंगलातील गवताची कापणी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत बसून जात असलेल्या महिला कामगारांचा ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. त्यात २० महिलांना किरकाेळ दुखापत झाली. त्या ट्राॅलीत ४० महिला असल्याची माहिती जाणकार व्यक्तीने दिली. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पेंच आरक्षित जंगलातील माथाल टेक परिसरात साेमवारी (दि. ३०) सकाळी ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान घडली.
वन विभागाने जंगलातील गवत कापण्याच्या कामाचे कंत्राट दिले आहे. कंत्राटदाराच्या सांगण्यावरून ट्रॅक्टरचालक मनाेहर कुंभरे, रा. खापा याने विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत ४० महिला कामगारांना बसविले आणि त्यांना घेऊन खाप्याहून अंबाखेरीच्या दिशेने राखीव जंगलातील मार्गाने निघाला. माथाल टेक परिसरात त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि वेगात असलेल्या ट्रॅक्टरची ट्राॅली उलटली. त्यात ट्राॅलीतील २० महिलांना दुखापत झाली. त्यांची नावे मात्र कळू शकली नाही.
अपघात हाेताच सर्व जखमींना तातडीने रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार केल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतरही वनकर्मचारी व अधिकारी वेळीच घटनास्थळी दाखल झाले नव्हते, अशी माहिती पर्यटकांनी दिली. त्यांनीच ट्राॅली सरळ करून जखमींना उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था केली. अपघातग्रस्त ट्रॅक्टर पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आला असून, त्याचा क्रमांक व मालकाचे नाव शाेधले जाईल, त्यांना आरक्षित जंगलात प्रवेश करण्याची परवानगी कुणी दिली, हेही तपासले जाईल, अशी माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी भादंवि ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड करीत आहेत.
---
उपाययाेजनांना तिलांजली
सध्या काेराेना संक्रमण सुरू असल्याने मास्क वापरण्याचे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना वेळाेवेळी आवाहन केले जाते. या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत प्रमाणाबाहेर कामगारांना बसविण्यात आल्याने तसेच त्यातील कुणीही मास्क लावला नसल्याने कंत्राटदाराने या उपाययाेजनांना तिलांजली दिल्याचे स्पष्ट हाेते. या गंभीर प्रकाराकडे वनअधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.