लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘जिंदगी की बुलेट ट्रेन’ अशा एका सरळ ठोक वाक्यात ‘शौक’चे वर्णन करता येते. आत हे शौक कोणते, या वादात पडण्यात अर्थ नाही. कारण, काही शौक अधोगतीस कारणीभूत ठरतात तर काही उत्कर्षाचा मार्ग प्रशस्त करतात. कोरोना संसर्ग आणि त्यायोगे लागू झालेल्या टाळेबंदीतही कलाक्षेत्रातील शौक थांबले नाही. ‘ना जग से, तो अकेलाच सहीं’ या अर्थाने कलावंतांनी आपल्या कलाविष्कारावर विरजण पडू दिले नाही. या आविष्कारात गर्दीतील जल्लोष नव्हता, हे खरे असले तरी आपल्या कार्याला ब्रेक लावेल तो कलावंत कसला? गरजेतून आविष्कार जन्माला येतात आणि संकटातून मार्ग शोधले जातात, याची अनेक उदाहरणे या काळात बघता आली.
कलाक्षेत्रात घडलेली डिजिटल क्रांती
मोबाईल अॅप आणि डिजिटल क्रांतीचे वेध कलाक्षेत्राला नवे नाही. उलट, सर्वात वेगवान डिजिटल बदल कलाक्षेत्रातच दिसून येतो. मात्र, ग्लोबल व्हिलेजची संकल्पना प्रत्यक्षात साकारली गेली ती याच काळात. गाण्यांचे प्रयोग, नाटकांचे प्रयोग, गप्पांचे फड, व्याख्याने सगळेच्या सगळे ऑनलाईन पार पडले. रसिक, प्रेक्षकांनीही या सगळ्यांचा आस्वाद प्रथमच डिजिटल स्वरूपात घेतला, हे विशेष.
आत्ममग्न कलावंत पब्लिक प्लॅटफॉर्मवर
शॉट फिल्म्स, वेब सिरिज आदींची चुणुक याच काळात सर्वाधिक लागल्याचे दिसून आले. स्मार्टफोन, अॅण्ड्राॅईड फोन वापरणारी बरीच मंडळी कॉलिंग आणि मॅसेजपर्यंतच मर्यादित होती. त्याही पुढे जात व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या पलीकडे जाण्याची कुणाचीच इच्छा नव्हती. मात्र, टाळेबंदीत घरच्या घरी कोंडून घेतलेल्या अनेकांनी नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा शोध घेतला. सिनेमा, ज्ञानवर्धक गोष्टी, गावाच्या पलीकडेही काही आहे, याची जाणीव करवून घेण्यात अनेकांनी रस घेतला.
ऑनलाईन कार्यशाळांचा लाभ
ऑनलाईन कार्यशाळांनी आंतरराष्ट्रीय स्तर गाठला. विशेषत: नाटकांच्या कार्यशाळा प्रथमच ऑनलाईन आणि नि:शुल्क पार पडल्या. त्यामुळे, नागपूरसारख्या शहरातील रंगकर्मींना दिल्लीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळांचा लाभ घेता आला. एरवी दिल्ली किंवा देशाच्या अन्य शहरात जाणे, तेथे राहणे, खाण्याचा खर्च, कार्यशाळेचा खर्च परवडणारा नव्हता. हा खर्च मायनस होत थेट लाभ घेता आला.
आर्थिक गणिते सोडविण्यास घेतला पुढाकार
कलावंत आत्ममग्न असतो आणि सच्चा कलावंत पैशाच्या मागे धावत नाही, ही बाब खरी असली तरी पोट भरण्यासाठी अन्न लागते आणि अन्नासाठी पैसा लागतो. ही जाणीव आर्थिक टंचाईच्या या काळात कलावंतांना झाली. पूर्णवेळ कलाक्षेत्रावर निर्भर असणाऱ्या कलावंतांनी नवे आर्थिक स्रोत धुंडाळले. जे नोकरीच्या भरवशावर कलासाधना करीत होते, त्यांची नोकरी गेल्यावर त्यांनी नव्या पर्यायाचा शोध घेत एकमेकांसोबत आधार घेण्याचा व एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. सोबतच नाट्य प्रयोग वितरणाची साखळी प्रथम तयार झाली.
नाटक, नृत्य, गायन सारेच ऑनलाईन
नाटक, नृत्य हे प्रत्यक्ष अनुभवण्याच्या कलाविदा आहेत. टाळेबंदीत हे शक्य नव्हते. टाळेबंदीतील सुरुवातीचा महिना सोडला तर नंतर कलावंतांनी ऑनलाईनकडे मोर्चा वळवला. नाटकाच्या ऑनलाईन तालमी सुरू झाल्या. विशेष म्हणजे, नाटकेही ऑनलाईन सादर झाली. प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी सभागृहात मोजके प्रेक्षक कलेचा आस्वाद घेत असतात. मात्र, या नव्या विदेमुळे जगभरातील प्रेक्षक मिळायला लागले. काही नाट्यसंघांनी ऑनलाईन व्यावसायिक प्रयोगही केले. त्याचा त्यांना भक्कम लाभही झाला.
जुन्या पुस्तकांचा शोध
या काळात अनेकांनी जुन्या पुस्तकांचा शोध घेतला. सोबतच वाचनावर भर देऊन आकलनक्षमता वाढविण्याकडे कलावंतांचा कल राहिला. ऑनलाईन वाचनावरही मोठ्या संख्येने भर देण्यात आला. अनेक पुस्तकांचे प्रकाशन ऑनलाईन होऊन, मोठ्या प्रमाणात ऑनलाईन विक्रीही झाली.
बरेच महोत्सव झाले स्थगित
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन ऐनवेळी स्थगित करावे लागले. नवा मुहूर्त अद्याप सापडलेला नाही. त्यातच विदर्भ साहित्य संघाचे ६७ वे साहित्य संमेलनही स्थगित झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षाची निवड अद्यापही झालेली नाही आणि पुढचे संमेलन कुठे होणार, यावरही निर्णय लांबलेला आहे. सिनेमागृहांना परवानगी मिळूनही नवे चित्रपट नसल्याने आणि प्रेक्षकांनी संसर्गाच्या भीतीने पाठ फिरविल्याने थिएटर्स बंदच राहिली.
.....¯....