आरटीओ : २००९ पासून यंत्र बंद स्थितीतनागपूर : नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कार्यपद्धतीची माहिती व हवा तो छापील अर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात १५वर आरटीओ कार्यालयात ‘टच स्क्रिन’ यंत्र लावण्यात आले. नागपूर शहर व ग्रामीण कार्यालयात हे ‘टच स्क्रिन’ यंत्र जून २००९ मध्ये सुरू झाले. सुरुवातीला काही दिवस सुरू राहिलेले हे यंत्र नंतर बंद स्थितीत ठेवण्यात आले, ते आजही कायम आहे. परिणामी या यंत्रावर झालेल्या खर्चावर पाणी फेरले आहे. आरटीओ कार्यालयात अर्जांचा तुटवडा नेहमीच पडतो. सध्या कार्यालयात शिकाऊ परवानासाठी लागणारा अर्ज नमुना क्र.१ व आरोग्यविषयक माहितीचा अर्ज नमुना क्र.२, कायम परवानासाठी लागणारा अर्ज नमुना क्र.४, नवीनीकरणासाठी लागणारा परवाना अर्ज नमुना क्र.९, दुय्यम परवाना अर्ज (एलएलडी) व टॅक्समधून सूट मिळविण्यासाठी असलेला अर्ज (एमटी) नाहीत. याचा फायदा झेरॉक्स सेंटर घेत आहेत. एका अर्जाची किंमत ५ रुपयावर गेली आहे. ‘टच स्क्रिन’ यंत्रात हवा तो अर्ज नि:शुल्क मिळण्याची सोय आहे. याशिवाय कार्यालयीन माहिती किंवा परवाना काढण्यासंदर्भाची माहिती उपलब्ध होते.मात्र, कार्यालयात येणाऱ्या नवख्या उमेदवाराला या यंत्राविषयी विशेष ज्ञान अवगत नसल्याने याचा फायदा दलालच अधिक घेत असल्याचे व अर्जासाठी कागदाचा पुरवठा करण्यावरील खर्च वाढल्याने हे यंत्रच बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या यंत्राची किमत साधारण एक लाख रुपये आहे. शहर आरटीओ कार्यालयाने दरम्यानच्या काळात ते सुरू करण्याचाही प्रयत्न केला. परंतु उमेदवार याचा फारसा उपयोग करीत नसल्याचे पाहत ते बंद करण्यात आले. सध्याच्या स्थितीत या दोन्ही कार्यालयात अडगळीच्या ठिकाणी हे यंत्र धूळखात पडून आहे. (प्रतिनिधी)
‘टच स्क्रीन’ फेरले पाणी
By admin | Updated: July 20, 2015 03:12 IST