नागपूर : १९९९ साली कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या घुसखाेरीला उद्ध्वस्त करीत त्यांना नामाेहरम करणाऱ्या कारगिल विजयाच्या स्मृतीला आज २२ वर्षे पूर्ण हाेत आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात या भारतीय जवानांच्या शाैर्याचा अभिमान आणि शहीद झालेल्या सैनिकांप्रति कृतज्ञता आहे. या स्मृती जाग्या करीत साेमवारी ठिकठिकाणी कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे.
नागपूर शहरात तीन ठिकाणी असलेल्या अमर जवान शहीद स्मारकावर विशेष श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. शहरातील १९ माजी सैनिक संघटनांच्या संयुक्त शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष सुभेदार शेषराव मुराेडिया यांनी कार्यक्रमांची माहिती दिली. सकाळी ९ वाजता काॅटन मार्केट परिसरातील शहीद स्मारकावर श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता वर्धा राेड, अजनी चाैक येथे अमर जवान शहीद स्मारकावर श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. यादरम्यान लक्ष्मीनगर चाैक येथील शहीद स्मारकावर स्वच्छता आणि मालार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. नागपूर शहरात सैन्यदल, नाैदल व वायुसेनेचे जवान व त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमात माेठ्या संख्येने सहभागी हाेतील. नागरिकांनीही या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सुभेदार मुराेडिया यांनी केले.