सौरभ ढोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल : शहरातील चौबे ले-आऊटमध्ये दोन घरांच्या मध्ये नगरपालिका प्रशासनाच्या सूचनेवरून रहदारीसाठी रस्ता सोडण्यात आला होता. त्या रस्त्यावर टिनाचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले. याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतरही त्यांची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
एम. परतेती (रा. चौबे ले-आऊट, काटोल) यांच्या घराजळ आलेल्या दोन घरांच्या मध्ये मोकळी जागा सोडण्यात आली होती. नागरिक त्या जागेचा वावर रहदारीसाठी करायचे. मध्यंतरी एकाने त्या जागेवर अतिक्रमण करून त्यावर टिनाचे शेड उभारले. त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. हा प्रकार येथेच थांबला नाही तर त्या व्यक्तीने शेडखाली चूल तयार केली असून, त्या चुलीतील धुराचा परतेती यांच्यासह परिसरातील नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागतो.
परिणामी, परतेती यांच्यासह इतरांनी त्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु ती व्यक्ती कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने शेवटी परतेती यांनी ११ फेब्रुवारी २०२१ रोजी नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रार केली. यासंदर्भात त्यांनी नगराध्यक्ष, पालिकेचे अधिकारी व नगरसेवकांच्याही भेटी घेतल्या; परंतु प्रशासनाने यावर काहीही कारवाई न केल्याने त्या व्यक्तीचे मनोधैर्य उंचावले आहे. पालिका प्रशासन शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवित नसेल तर सामान्य माणसांनी कुणाकडे दाद मागायची, नागरिकांनी आणखी किती त्रास सहन करायचा, असा प्रश्नही परतेती यांनी उपस्थित केला आहे.
...
भांडणांचे प्रमाण वाढले
पालिका प्रशासन संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे ती व्यक्ती भांडणे उकरून काढत असल्याचे परतेती यांनी सांगितले. याच वादातून भविष्यात मोठी भांडणे किंवा हाणामारी झाल्यास त्याला कोण जबाबदार राहणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी ही समस्या कायमची सोडवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.