नागपूर : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले गुगामल वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जामीन अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी राज्य सरकारला मंगळवारी दोन दिवसाचा वेळ वाढवून देण्यात आला. हा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप आहे. चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलिसांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी, विनोद शिवकुमार आदींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर विविध गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. शिवकुमारतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.