नागपूर : सत्र न्यायालयाने शाळकरी मुलीला लैंगिक स्पर्श करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. अरविंद उत्तम वानखेडे (४७) असे आरोपीचे नाव असून तो द्रोणाचार्यनगर, डोरले ले-आऊट येथील रहिवासी आहे. त्याला पोक्सो (लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण) कायद्याच्या कलम ८ अंतर्गत दोषी ठरवून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (२)(एफ) व पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला नाही. त्याच्याविरुद्ध या तिन्ही कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपी व्यवसायाने आॅटोचालक असून, पीडित मुलगी त्याच्या आॅटोतून रोज शाळेत जाणे-येणे करीत होती. २ मार्च २०१६ रोजी मुलगी आॅटोत एकटीच असताना आरोपीने तिच्यासोबत लैंगिक कृत्य केले. ही घटना अंबाझरी पोलिसांच्या हद्दीत घडली होती. मुलीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ४ मार्च रोजी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अर्चना वाघमारे यांनी प्रकरणाचा तपास केला होता. न्यायालयात शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता आर. आर. मेंढे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
लैंगिक स्पर्श करणाऱ्यास तीन वर्षे कारावास
By admin | Updated: March 22, 2017 02:52 IST