वेडसर तरुणाने केली मारहाण टाकळघाट : स्थानिक विक्तुबाबा मंदिराच्या परिसरातील घरासमोर खेळत असलेल्या तीन वर्षीय बालकाला वेडसर तरुणाने पकडले आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तरुणाने त्या बालकाच्या पाठीवर हाताने वार केले तसेच त्याला जमिनीवर आदळले. यात गंभीर दुखापत झाल्याने त्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली असून एमआयडीसी, बुटीबोरी पोलिसांनी आरोपीला अटक केली. अथर्व अमरदीप श्रीरामे (३, रा. टाकळघाट, ता. हिंगणा) असे मृत बालकाचे नाव असून, विचेत संभाजी वाघमारे (२०, रा. टाकळघाट, ता. हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमरदीप मेश्राम हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मीनझरी (ता. चिमूर) येथील रहिवासी असून, ते कामाच्या शोधात या परिसरात आल्याने कुटुंबासह टाकळघाट येथील विक्तुबाबा मंदिराच्या परिसरातील झोपडपट्टीत राहतात. अथर्व नेहमीप्रमाणे घरासमोर असलेल्या रोडच्या कडेला एकटाच खेळत होता. त्याचवेळी विचेतची नजर त्याच्यावर पडली. विचेतने अथर्वला पकडले आणि त्याच्या पाठीवर हाताने जोरात मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे अथर्व रडायला लागला. त्याच्या रडण्याचा आवाज कुणालाही ऐकायला गेला नाही. त्यामुळे हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. त्यानंतर विचेतने अथर्वला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत मातीच्या ढिगाऱ्यावर व जमिनीवर आदळले. हा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी अथर्वला विचेतच्या तावडीतून सोडविले आणि लगेच बुटीबोरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. विचेत हा वेडसर असून, त्याने यापूर्वी तीनदा बालकांना मारहाण केली होती. परंतु त्यात जीवित हानी झाली नव्हती. मात्र, शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निमर्णण झाले आहे. (वार्ताहर)
तीन वर्षीय बालकाची हत्या \टाकळघाट येथील घटना :
By admin | Updated: March 5, 2017 01:56 IST