नागपूर विद्यापीठ : प्रशासन व महाविद्यालयांमध्ये समन्वयाचा अभावनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नुकतेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ‘आॅनलाईन’ फेरमूल्यांकनाचे निर्देश जारी केले होते. परंतु उन्हाळी परीक्षांचे निकाल लागल्यानंतर सुमारे तीन हजार विद्यार्थी इच्छा असूनदेखील फेरमूल्यांकनासाठी अर्ज करण्यास अपयशी ठरले आहेत. हे सर्व विद्यार्थी अभियांत्रिकीच्या चौथ्या सेमिस्टरचे आहेत.विद्यापीठाने ‘आॅनलाईन’ फेरमूल्यांकनासंदर्भात २७ आॅगस्ट रोजी निर्देश जारी केले होते. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल २३ आॅगस्टनंतर जाहीर झाले आहेत, त्यांचे अर्ज निर्देश क्रमांक २४/२०१४ अंतर्गत स्वीकारण्याची सूचना देण्यात आली होती. दरम्यान, २३ आॅगस्ट रोजी विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या चौथ्या सेमिस्टरच्या सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमांचे निकाल घोषित केले. यात जवळपास साडेचार हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रणालीवर विश्वास नसल्याने अनेकदा उत्तीर्ण विद्यार्थीदेखील अर्ज करतात. निकाल जाहीर झाल्यानंतर फेरमूल्यांकनासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख ३ सप्टेंबर ही निर्धारित करण्यात आली होती.परंतु निर्देश जारी झाल्यानंतर ही तारीख ३० आॅगस्ट करण्यात आली व विद्यार्थ्यांना याची सूचनाच देण्यात आली नाही. १ सप्टेंबर रोजी अर्ज करण्यासाठी महाविद्यालयांत पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्जच स्वीकारण्यात आले नाही. महाविद्यालयांनी विद्यापीठाचे निर्देश असल्याचे सांगत हात वर केले. परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनीदेखील विद्यार्थ्यांची मदत करण्यास नकार दिला.(प्रतिनिधी)केवळ एकच दिवसाचा अवधीअभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आॅनला़ईन’ फेरमूल्यांकन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला होता. विद्यापीठाने २७ आॅगस्ट रोजी निर्देश जारी केले. ३० आॅगस्ट रोजी हे निर्देश संकेतस्थळावर ‘अपलोड’ करण्यात आले. विद्यापीठाने दावा केला आहे की, महाविद्यालयांना त्याच दिवशी माहिती देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी केवळ २८ आॅगस्टचा एकच दिवस मिळाला. २९ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थीची सुटी होती व ३० आॅगस्ट रोजी शनिवार असल्यामुळे अर्धा दिवस कामकाज होते. यासंदर्भात प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोमावार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
तीन हजार विद्यार्थी फेरमूल्यांकनापासून वंचित
By admin | Updated: September 3, 2014 01:18 IST