बुटीबोरीतील लैंगिक अत्याचार प्रकरण: आदिवासी विभागाचा दणका नागपूर : बुटीबोरी येथील होलिक्रॉस निवासी शाळेतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार आणि विद्यार्थिनीचे विनयभंग प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात हलगर्जी बाळगल्याचा ठपका ठेवत देवरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा होलिक्रॉस शाळेचे पालकसचिव व्ही. बेले यांच्यासह अहेरी आणि नागपूर कार्यालयातील अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये व्ही. बेले यांच्यासह अहेरी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी गेडाम, नागपूर प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी पिसुड्डे यांचा समावेश आहे. बुटीबोरी येथील होलिक्रॉस निवासी शाळेतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा उघड होताच बुधवारी शाळा आणि पोलीस ठाण्यासमोर संतप्त पालकांनी घेराव घातला होता. या प्रकरणातील आरोपीला अटक करा, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जमावाने केली होती. त्याची दखल घेत आरोपी होमराज पडोळे याला त्याच दिवशी भिवापुरातून अटक केली. त्याच्यासह संस्थाचालक अरुण हुसुकले, मुख्याध्यापिका, वसतिगृह अधिक्षिकेवरही गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता मुख्य आरोपी चौकीदाराला २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर उर्वरित आरोपींना जामीन मंजूर केला. जामीन मंजूर केला असला तरी त्या सर्वांना बुटीबोरी परिसरात सात दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या या शाळेचे पालकसचिव म्हणून देवरी येथील कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. बेले यांच्यावर जबाबदारी होती. मात्र त्यांनी शाळेची व्यवस्थित पाहणी न करणे, कामात हयगय केल्यानेच हा प्रकार घडला.
तीन अधिकारी निलंबित
By admin | Updated: December 25, 2016 02:53 IST